Tuesday, April 23, 2024

/

महाराष्ट्राबरोबर जलसामंजस्य करार:डी के शिवकुमार

 belgaum
कृष्णा नदीकाठावरील प्रदेशात दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणार्‍या पाणी समस्येचे कायमस्वरुपी निवारण करण्यासाठी महाराष्ट्राबरोबर जलसामंजस्य करार करण्यास कर्नाटक सरकार कटिबध्द असल्याचे पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र सरकारकडून कृष्णा नदीत कोयनेचे पाणी सोडण्यासंदर्भात येथील क्लब रोडवरील कर्नाटक पाणी महामंडळ्याच्या मुख्य अभियंता कार्यालयात सोमवारी बैठक झाली. यावेळी बेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्ह्यातील आमदार व खासदार उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर शिवकुमार यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
दरवर्षी चार टीएमसी पाण्याच्या वापरासंदर्भात महाराष्ट्र सरकारने आपल्या कराराचा प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला असून उभय राज्यांच्या कृष्णाकाठ भागातील लोकांची समस्या कायमची संपुष्टात यावी, यासाठी कर्नाटक करार करण्यास सहमत आहे, असे सामंजस्य पथक ताबडतोब महाराष्ट्र सरकारला पाठविण्याचे राज्याचे मुख्यसचिव टी. एम. विजयभास्कर यांना सांगितल्याचे शिवकुमार म्हणाले.
Dk shivkumar meeting
हिवाळा व पावसाळ्यात प्रत्येकी दोन टीएमसी पाणी आम्हाला मिळवून दिल्यास उन्हाळ्यात पेयजल समस्याचे निवारण करण्यास कृष्णेमध्ये चार टीएमसी पाणी सोडण्याबाबत प्रस्तावात म्हटले आहे. आतापर्यंत महाराष्ट्र सरकार पैसे घेऊन पाणी पुरवत होते. २००४ ते २०१७ पर्यंत अनेकवेळा अशाप्रमाणे पाणी मिळवले आहे. यावेळी मात्र पाणी वापर प्रस्ताव आम्ही सादर केला आहे. कर्नाटक सरकारसुध्दा सकारात्मक निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
चार टीएमसी पाणी वापराबाबत सखोल अभ्यास करुन अहवाल सादर करण्यास तांत्रिक समिती स्थापण्यास येईल. तिच्या अहवालाच्या आधारावर कायदेशीर मत आजमावून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
ताबडतोब पाणी सोडण्याची विनंती
कृष्णा काठावरील बेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्ह्याच्या विविध भागात पाणी समस्या बिकट आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राने ताबडतोब कोयनेतून चार टीएमसी पाणी कृष्णेत सोडावे, अशी विनंती शिवकुमार यांनी केली आहे. तरीही महाराष्ट्राने पाणी सोडलेले नाही.
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री आर. बी. तिम्मापूर, सरकारचे मुख्य प्रतोद गणेश हुक्केरी, आ. महांतेश कवटगीमठ, महांतेश कौजलगी, श्रीमंत पाटील, आनंद न्यामगौड, खा. प्रकाश हुक्केरी, डॉ. प्रभाकर कोरे, सिध्दू सवदी, आ. एस. आर. पाटील, हनमंत निराणी आदी यावेळी उपस्थित होते. कर्नाटक पाणी महामंडळाचे मुख्य अभियंता अरविंद कणगील यांनी जलसमस्येची  माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.