महिपाळगड हा तसा निसर्गाने नटलेला आणि वनराईत वसलेला गड म्हणून ओळखला जातो. या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते. पावसाळ्यात येथील निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी शहर आणि परिसरातील निसर्गप्रेमी त्या ठिकाणी जात असतात. मात्र आता या गडाला मद्यपीची व तळीरामांची तसेच प्रेमीयुगुलांची नजर लागल्याचे दिसून येत आहे.
महिपाळगड परिसरात अनेक मद्यपी मद्य ढोसून बाटल्या तिथेच फेकण्याचे प्रकार वाढले आहेत. बाटल्या फक्त फेकल्या जात नाहीत तर फोडून फेकल्या जातात, याचा फटका या स्थळाला बसत आहे.
ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या घटना बारा महिने सुरूच असतात. निसर्ग धोक्यात आणण्याचे काम केल्याचे उघडकीस येत आहे. अशा कारवाया रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महिपाळगड परिसरात अनेक पर्यटक पावसाळ्यात येत असतात. तेथील निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी अनेक परगावाहून व परराज्यातील पर्यटक महिपाळगडला भेट देत असतात. गडाच्या समोरील भागातच गेल्यानंतर बेळगावचे संपूर्ण दर्शन होते. मात्र आता या महिपाळगड च्या परिसरात मद्यपींनी अनेकांची डोकेदुखी वाढवली आहे. असे अनेक गैरप्रकार येथे घडत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
महिपाळगड परिसरात बाटल्यांचा खच पडला आहे. मात्र याचे सोयरसुतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे. ही बाब धोक्याची असून याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
अनेकवेळा तर काही गैरप्रकार करणाऱ्या प्रेमीयुगलांना येथील नागरिकांनी खडसावले असले तरी त्याची तमा न बाळगता प्रेमात गुंग झालेल्या आणि इतिहासाच्या साक्षीदाराचे विस्मरण झालेल्या अशांना चांगलीच अद्दल घडवण्याची गरज आज निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत ग्रामपंचायतीने दखल घेऊन असे गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
या परिसरात वैजनाथ मंदिर आहे हे या मंदिराचे पावित्र्य ही अशा मद्यपी व प्रेमी युगुलांच्या मनमानीमुळे धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे गैरप्रकार रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.