महाशिवरात्रीनिमित्त शहरात धार्मिक वातावरण
महाशिवरात्री असल्यामुळे बेळगाव शहरामध्ये धार्मिक वातावरण आहे. शहर आणि परिसरातील शिव मंदिरांमध्ये महारुद्राभिषेक, लघुरुद्राभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी रात्री बारा पासूनच या धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार असून शंकराचा पहाटेच्या वेळी अभिषेक करण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. विशेष म्हणजे बेळगाव शहरातील एक प्रमुख शक्तिपीठ म्हणून ओळखले जाणारे आणि दक्षिणकाशी अशी ओळख असणाऱ्या कपलेश्वर मंदिरात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबरीने मिलिटरी महादेव मंदिर तसेच इतर ठिकाणी असलेल्या शिवालयांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची व्यवस्था करण्यात आले आहे.
बेळगाव शहराच्या आजूबाजूला असलेल्या शंकरांच्या देवस्थानांमध्ये ही भाविकांची दरवर्षी प्रचंड गर्दी होते. महाशिवरात्रि दिवशी महारुद्र व अभिषेक होतात आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. काकती व कणबर्गी येथील सिद्धेश्वर ,कंग्राळी बुद्रुक येथील कलमेश्वर देवस्थान याच बरोबरीने इतर अनेक ठिकाणी अशा विधी आयोजित करण्यात येतात.
शंकराची भक्ती करणारे भाविक महाशिवरात्रीला उपवास करून उपवास दुसर्या दिवशी सोडतात अतिशय कडक उपवास असलेला हा सण भक्तीभावाने साजरा करण्याची तयारी सुरू आहे.