वार्षिक राशिभविष्य आजची राशी ” मिथुन
आजची राशी ” मिथुन”
(राशीस्वामी- बुध)
|| संधीचं सोनं कराल ||
राशी वैशिष्ट्ये
मिथुन ही कालपुरुष कुंडलीतील तिसऱ्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी बुध आहे. वायूतत्वाची द्विस्वभाव राशी असून पश्चिम दिशेवर प्रभुत्व आहे. या राशीच्या व्यक्ती फार बुद्धिमान असतात. त्यांची आकलनशक्ती , हजरजबाबीपणा, तर्कशक्ती, स्मरणशक्ती, ग्रहणक्षमता चांगली असते. मितभाषी, उत्कृष्ट वक्तृत्व,भाषाशैली उत्तम असते.
स्वभाव वैशिष्ट्ये
या राशीतील व्यक्ती थोड्या धरसोड वृत्तीच्या असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत साम्य नसते.ते पराक्रमी असतात, कामाचा उरक चांगला असतो. दुसऱ्यांची मते ते कधीच ऐकून घेत नाहीत. मित्रपरिवार मोठा असतो, या राशीच्या व्यक्तीचा बौद्धिक क्षेत्रातील व्यवसायाशी जास्त संबंध येतो. बोलण्याच्या कलेत निपुण असल्याने अशा व्यक्ती उत्तम वक्ता, प्राध्यापक, वकील, व्यापारी, कन्सल्टंट, आयकर, सेल्समन, एजंट, वृत्तसंपादक तसेच कलाक्षेत्रातही दिसून येतात.
या राशीच्या व्यक्तींना मूत्रविकार, मज्जासंस्थेचे विकार, मेंदूत बिघाड, फिट्स यासारखे विकार होऊ शकतात. या राशीच्या स्त्रिया बोलक्या असतात. पत्रिकेतील ग्रह बिघडल्यास गुन्हेगारी व फसवणुकीची प्रवृत्ती असते.
वार्षिक ग्रहमान
मिथुन राशीच्या व्यक्तींना यावर्षी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यात काही परिवर्तन घडवून आणल्याशिवाय गत्यंतर नाही.आपण जीवनात कमावलेले अनुभव आपणास जीवन मार्गात येणारे अडथळे दूर करण्यास उपयोगी ठरतील. या अनुभवांच्या जोरावर आपण येणाऱ्या संधीचे सोने कराल.
जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात वर्षारंभी आपल्या राशीच्या दशमात मंगळ आहे. हा मंगळ व्यक्तीला धनवान बनवतो. त्यामुळे आपण काही धाडसी निर्णय घ्याल. व्यापार व नोकरीच्या दृष्टीने हा मंगळ आपणास शुभ राहील. विशेष करून सरकारी नोकरी व सैन्यदलात काम करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. याकाळात विद्यार्थी वर्गाला देखील काळ चांगला राहील. वर्षभर नेप आपल्या भाग्यात असल्याने गूढ शास्त्रासंबंधी अभ्यास अथवा नवीन काही शिकण्याची संधी मिळेल. आध्यात्मिक दृष्ट्याही हा नेपच्यून चांगली फळे देईल.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला प्लूटो बरोबर शुक्रही आपल्या सप्तमात येईल त्यामुळे वैवाहिक जीवनात काही विचित्रपणा देणारा काळ राहील. हे स्थान शुक्राला चांगले असले तरी धनुचा शुक्र विशेष चांगली फळे देत नाही. त्याबरोबर शनी प्लूटो वैवाहिक जीवनात सुखात कमतरता देईल. त्यामुळे विवाहित असाल तर याकाळात जोडीदाराशी जमवून घ्यावे लागेल.
मार्च व एप्रिल महिन्यात आपणास काही अचानक धनलाभाचे योग येतील. मानसन्मानात वाढ होईल. व्यापारी वर्गाला चांगले दिवस आहेत. नोकर चाकर चांगले मिळतील कारण वर्षभर आपल्या
षष्ठात गुरू आहे. त्यामुळे आज्ञाधारक विश्वासू नोकरांचे सुख मिळेल. याकाळात वयस्कर मंडळींनी खाण्याचा अतिरेक टाळावा. गुरू षष्ठात प्रकृती चांगली ठेवत असला तरी मधुमेह असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. लाभातला हर्षल मंगळ योग तरुण तरुणींना लहरी मित्र देतील. त्यामुळे पुष्कळ वेळा मित्रांमुळे अडचणीत पडल्याचे योग येऊ शकतात. स्त्रियांना याकाळात संतती पासून त्रास होऊ शकतात. गर्भवती स्त्रियांनी याकाळात प्रकृती सांभाळावी. व्यापारी वर्गाला याकाळात स्वगृहीचा मंगळ काही आर्थिक लाभ मिळवून देईल. राजकारणी लोकांना मानसन्मान मिळवून देईल.
१५ एप्रिल नंतर दशमात येणारा शुक्र मे व जून महिन्यात चांगली फळे देईल. कला, संगीत व नाट्य क्षेत्रातील लोकांना चांगला राहील. १० मे पर्यंत आपणास चांगली फळे देईल. या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्याना याकाळात नवीन संधी प्राप्त होतील. स्त्रियांसाठी देखील हा काळ उत्तम राहील. ज्या स्त्रिया सौन्दर्यकारक वस्तू व्यापारात आहेत किंव्हा ब्युटीपार्लर बुटीक सारखे व्यवसाय सुरू करण्यास उत्तम काळ राहील. परंतु याकाळात व्यापारी किंवा गुंतवणूक दारांनी पैशाची गुंतवणूक करणाऱ्यांनी विचार करून आर्थिक व्यवहार करावेत. व्ययातील मंगळ आपणास कर्जबाजारी व देवघेवीच्या व्यवहारात बुड आणणारा राहील. व्यसन करणाऱ्यांनी व्यसनापासून दूर राहावे तसेच याकाळात डोळ्यांचे व उष्णतेचे त्रास जाणवतील. स्त्रियांनी याकाळात प्रवासात दागिने संभाळावे. प्रवासात त्रास होतील शक्यतो प्रवास टाळावा.
जुलै च्या सुरुवातीला आपल्या राशीत रवी शुक्र व राहू येतात. रवीला हे स्थान चांगले असल्याने आपल्या महत्वाकांक्षेत या काळात वाढ होईल. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होईल. रवी गुरू युती चांगली असली तरी या बरोबर राहू आहे हे विसरून चालणार नाही. याकाळात नोकरीत असणाऱ्याना वरिष्ठांकडून एकाद्यावेळेस अपमानास्पद वागणूक मिळण्याची शक्यता आहे. जुलैत आपला खर्चीकपणा वाढेल. आवक पेक्षा जावक वाढेल. स्त्रिया चैनीच्या वस्तूंवर खर्च करतील. डोळ्यांचे त्रास होतील. १६ जुलैचे ग्रहण आपणास मिश्रफलदायी राहील.
ऑगस्टला तृतीयातील मंगळ पराक्रमात वाढ करेल. स्वपराक्रमाने धन संपादन कराल. मित्रांकडून लाभ होतील. परंतु शेजारी व बंधू भगिनींच्या दृष्टीने हा मंगळ विशेष चांगली फळे देणार नाही. कानासंबंधी विकार होतील. ऑगस्ट अखेर रवी मंगळ बुध शुक्र यांची तृतीयातील युती कापड व्यापारी, सौन्दर्य प्रसाधने व्यापारात असणाऱ्यांना उत्तम लाभदायी राहील. कोर्ट कचेरी व जमीन प्रकरणे मार्गी लागतील.
सप्टेंबर व ऑक्टोबर गृह सौख्याच्या दृष्टीने चांगला राहील. नवीन वास्तूचे स्वप्न पूर्ण कराल. वाहन सौख्य लाभेल. ज्यांना संतती नाही अशांना संतती सुख लाभेल. इतरांना संततीच्या बाबतीत उत्कर्षकारक बातमी मिळेल. मुलांचे सुख लाभेल. राजकारणी व्यक्तींना मानसन्मान मिळेल. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना याकाळात फायदा होईल. कवी लोकांना देखील नवीन काही करण्याची संधी मिळेल. कलाक्षेत्रात पाय मजबूत करण्यास उत्तम काळ राहील. विद्यार्थ्यांना कले संदर्भात बऱ्याचश्या चांगल्या संधी मिळतील.
नोव्हेंबर व डिसेंबर याकाळात खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे. षष्ठातील बुध मंगळ युती खाण्याच्या अतिरेकामुळे काही पोटाचे विकार देईल. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडथळे निर्माण होतील. प्राण्यांपासून काही त्रास होतील. दुखापती होऊ शकतील.
डिसेंबर महिना संमिश्र फलदायी राहील. राशीच्या अष्टमस्त शुक्र काही अचानक धनलाभ घडवून देईल. विवाहामुळे धनलाभ देईल. तर विवाहितांना जोडीदारामुळे काही आर्थिक लाभ होतील. या महिन्यातील ग्रहण मध्यम फलदायी आहे. वर्षा अखेर आपणास काही दूरचे प्रवास योग येतील. कुटुंबा सोबत वेळ घालवता येईल आणि सौख्यात वाढ होईल.
काही महत्वाचे
# मिथुन राशीतील नक्षत्रे: मृग, आर्द्रा, पुनर्वसू
# मृग स्वभाव : धार्मिक , उत्साही, नाम अक्षर :का, की
# आर्द्रा स्वभाव :चंचल, बलशाली नाम अक्षर : कु, घ, गं, छा
# पुनर्वसू स्वभाव : सरळ मनाचे विद्वान नाम अक्षर : के, को, हा
उपासना
# मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी बुधवारी पांढरे पूर्ण तांदूळ दान करावे. तसेच गणेशाचे पूजन करावे. पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य द्यावे.
# आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी काळ्या गाईला गुळ व हरभरा दान करावे. शनी किंवा मारुतीला तीळेल तेलाचे दिवे लावावे
#पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी उडीद व तिळाचे दिवे दान करावे तसेच दत्त पादुकावर भिजलेली हरभरा डाळ व गुळ वाहावा, दत्तदर्शन घ्यावे.
* महिलांनी कुंजीका स्तोत्राचा पाठ करावा, दत्तबावनी वाचावी
* विध्यार्थीवर्गाने विष्णू सहस्त्र नाम व व्यंकटेश स्तोत्र यश मिळेल.
* वयस्कर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जप करावा.
# भाग्यरत्न राशीप्रमाणे पाचू
कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
#शुभअंक: ५
# शुभवार : रविवार,बुधवार, गुरुवार
# शुभमहिने : ऑगस्ट, ऑक्टोबर, फेब्रुवारी
#रंग : पांढरा, आकाशी,
( भाग्योदय वयाच्या २३ ते ४१ या काळात होईल)