कर्नाटक सरकारने पोसलेल्या आणि येथील मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभे केलेल्या पांढऱ्या हत्तीच्या साफसफाईचे काम सुरू केले आहे. जनतेच्या पैशावर अधिवेशन भरवणारे सरकार आता पुन्हा कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यास सज्ज झाले आहे.
बेळगाव येथे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन १० डिसेंम्बर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार आहे. त्यामुळे महनीय व्यक्तीच्या दिमाखासाठी सुवर्णविधानसौध च्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. केवळ १० दिवसांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे हा लवाजमा कशासाठी? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
या पांढऱ्या हत्तीच्या स्वच्छतेसाठी मोठया प्रमाणात कामगार जमवण्यात आले आहेत. कोणतीही कसर राहू नये म्हणून अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. इमारतीच्या साफसफाई बरोबरच परिसरातील इतर भागही स्वछ करण्यात आला आहे. त्यामुळे वर्षातून एकदा याकडे पाहण्यात येते आणि कोट्यवधींची हानीही होते.
केवळ बेळगाव कर्नाटकाचे आहे हे दाखविण्यासाठी हा सारा खटाटोप असून या सरकारला कधी शहाणपण येणार? असा सवालही निर्माण झाला आहे. अधिवेशनात आलो म्हणून गोवा व इतर ठिकाणी सहल करणाऱ्या नेत्यांसाठी इतका खर्च का करण्यात येत आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.