गावाकडे सायकलवरून निघालेल्या वृद्धाचा अपघातात दुर्दैवी अंत; खानापूर तालुक्यातील घटना
बेळगाव लाईव्ह :वयाच्या ७५ व्या वर्षी सायकलवरून प्रवास करत असताना झालेल्या अपघातात एका वृद्धाचा दुर्दैवी अंत झाला. खानापूर तालुक्यातील झुंजवाड गावाजवळ एसटी बसने सायकलला धडक दिल्याने बाबासाब नबिसाब देशपैक (वय ७५, रा. झुंजवाड, ता. खानापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (१३ ऑक्टोबर) सकाळी सुमारे १०.३० वाजता बाळगुंद–बिडी रस्त्यावर ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाब देशपैक हे बेकवाडहून सायकलवरून झुंजवाड गावाच्या दिशेने जात होते. याचवेळी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची यल्लापूर आगाराची बस (क्र. KA 31 F 1611) बेकवाडकडून नंदगडच्या दिशेने जात होती. दरम्यान, बसची त्यांच्या सायकलला धडक बसली.
या धडकेत देशपैक यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. जखमा गंभीर असल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एका रस्ते अपघाताने ७५ वर्षीय वृद्धाचा जीवनप्रवास अचानक संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातासंदर्भात बसचालक मंजुनाथ बसवाणी कांबळे (रा. इंगळी, ता. हुक्केरी) याने बस भरधाव आणि निष्काळजीपणे चालविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ आणि १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक आर. एल. धर्मट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदगड पोलीस पुढील तपास करत आहेत.





