खानापूर-बेळगाव नवीन महामार्गावरील अपघाताची भीषणता; पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ब्रिजच्या कठड्याला जोरदार धडक
खानापूर लाईव्ह : पहाटेचा काळोख, महामार्गावरील वेग आणि एका क्षणाची चूक… अन् पाहता पाहता धावत्या ट्रकचे दोन भाग झाले! खानापूर-बेळगाव नवीन महामार्गावरील जुन्या कुपटगिरी रस्त्याच्या ब्रिजवर बुधवारी (१४ ऑक्टोबर) पहाटे झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रकचा इंजिन असलेला पुढील भाग आणि पेपरचे बंडल भरलेला मागील भाग वेगळा झाला. महामार्गावर तब्बल ४०० ते ५०० मीटर अंतरापर्यंत पेपरचे बंडल विखुरले. मात्र, या भीषण अपघातातून चालक किरकोळ खरचटण्यावर बचावल्याने मोठा अनर्थ टळला.
एका क्षणात ट्रकचे झाले दोन भाग!
मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक दांडेली येथील पेपर मिलमधून पेपरचे बंडल घेऊन दिल्लीच्या दिशेने निघाला होता. पहाटेच्या सुमारास खानापूर-बेळगाव महामार्गावरून जात असताना चालकाला झोप लागल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ट्रकने ब्रिजच्या बाजूच्या कठड्याला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की ट्रकचे पुढील आणि मागील भाग वेगळे झाले. ट्रकमधील पेपरचे बंडल महामार्गावर दूरवर विखुरले. अपघाताचे दृश्य पाहून धडकेची तीव्रता सहज लक्षात येत होती.

ट्रकचा चक्काचूर; चालक मात्र बचावला
अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे, ट्रकची अवस्था पाहता चालकाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असता; मात्र सुदैवाने त्याला केवळ किरकोळ खरचटले. त्यामुळे या अपघातात जीवितहानी झाली नाही.
अपघाताची माहिती चालकाने गणेबैल येथील महामार्गावरील टोलनाक्याला दिल्यानंतर खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पहाटे फिरायला गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या नजरेस अपघात
लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष व विद्यमान पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते अजित पाटील हे पहाटे फिरण्यासाठी गेले असताना त्यांच्या निदर्शनास हा अपघात आला. त्यांनी घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडिओसह अपघाताची माहिती पाठवली. तसेच ट्रकचालकाची विचारपूसही केली.
पहाटेच्या वेळी घडलेल्या या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ट्रकचे दोन भाग होण्याइतकी भीषण धडक होऊनही चालक बचावल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.





