belgaum

गांधी जयंतीच्या दिवशी विशेष ग्रामसभा अनुपस्थितीचा आरोप;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याच्या सरकारी सूचनेनंतरही कंग्राळी बी.के. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत विकास अधिकारी (PDO), सचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मनरेगा रोजगार कामगार महिलांना ग्रामसभेसाठी बोलावूनही त्यांची बैठक न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

माजी ग्रामपंचायत सदस्या रेखा हंडीकर यांनी यासंदर्भात ग्रामपंचायत तसेच तालुका पातळीवरील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचे सांगितले. मात्र, यावेळी त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष ग्रामसभेत मनरेगा (MGNREGA) अंतर्गत काम करणाऱ्या महिलांच्या समस्या, रोजगाराची कामे तसेच ‘व्हीबी जी राम जी’ योजनेअंतर्गत कामांचे नियोजन आणि कामांची वर्गवारी याबाबत सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित महिला कामगारांना ग्रामसभेबाबत योग्य पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 belgaum

रेखा हंडीकर यांच्या म्हणण्यानुसार, काही महिला सुमारे ४० रुपये गाडीभाडे खर्च करून ग्रामसभेसाठी पंचायतीमध्ये आल्या होत्या. सकाळी १० वाजता उपस्थित राहण्याची सूचना मिळाल्याने त्यांनी घरातील कामे आटोपून पंचायतीमध्ये हजेरी लावली. मात्र, संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने महिलांना ग्रामसभा न घेता परतावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी तालुका पंचायत अधिकारी प्रवीण कट्टी आणि मनरेगा अधिकारी कडेमणी यांचे कंग्राळी बी.के. ग्रामपंचायतीच्या कारभाराकडे लक्ष का नाही, असा सवालही रेखा हंडीकर यांनी उपस्थित केला.

सरकारच्या सूचनेनुसार ग्रामसभा घेण्यापूर्वी नियमानुसार सूचना देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच ग्रामसभेसाठी महिला कामगारांना बोलावून अधिकारी उपस्थित राहत नसतील, तर याची जबाबदारी निश्चित करून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकाराची योग्य चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या महिला कामगारांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त करताना रेखा हंडीकर यांनी, मनरेगा कामगार महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा महिलांना एकत्र करून ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.