बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील केदनुर परिसरात सध्या बटाटे काढणीच्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. शिवारात बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी करून तास फोडले जात असून जमिनीतून बटाटे बाहेर काढले जात आहेत. मात्र या ऐन काढणीच्या काळात शेतमजुरांची प्रचंड कमतरता भासत असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे.
ग्रामीण भागात ‘रोजगार हमी योजने’ची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने मजूर वर्ग तिकडे वळला आहे. रोहयोवर मिळणारी निश्चित मजुरी आणि ठरलेले तास यांमुळे शेतात काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. अधिक मजुरी देण्याची तयारी दर्शवूनही मजूर उपलब्ध होत नसल्याने काढणीचे काम रखडण्याची भीती निर्माण झाली आहे.
मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अखेर आपल्या घरातील माणसांनाच शेतात उतरवले आहे. केदनुरच्या शिवारात महिलांसह वयस्कर नागरिकही बटाटे गोळा करण्याच्या कामात राबतानाचे चित्र दिसून येत आहे.
मातीत रुतलेले बटाट्याचे पीक वेळेत बाहेर न काढल्यास ते कुजून नुकसान होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे निसर्गाच्या आणि मजुरांच्या या अडचणीवर मात करत केदनुरचे शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीने बटाटे काढणीचे काम पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहेत.





