belgaum

मराठी-उर्दू शिक्षक भरतीचा मुद्दा राज्य सरकारकडे

0
Yuva samiti logo
Yuva samiti logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारच्या प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी आणि उर्दू माध्यमांना डावलण्यात आल्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने समितीच्या निवेदनांची दखल घेत ती पुढील कार्यवाहीसाठी कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाच्या मुख्य सचिवांकडे पाठविली आहेत.

कर्नाटक सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या सुमारे १५ हजार रिक्त जागांच्या भरतीसाठी १२ ऑगस्ट २०२६ रोजी अधिसूचना जारी केली होती. मात्र, बेळगाव जिल्ह्यातील भरतीमध्ये मराठी आणि उर्दू माध्यमातील उमेदवारांना अपेक्षित प्रतिनिधित्व नसल्याने पात्र उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने १३, १४ आणि १८ ऑगस्ट रोजी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे निवेदने सादर केली. मराठी आणि उर्दू माध्यमातील पात्र उमेदवारांनाही शिक्षक भरतीमध्ये योग्य संधी द्यावी, आवश्यक सुधारणा करून सुधारित अधिसूचना काढावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.

 belgaum

१८ ऑगस्ट रोजीच्या जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पत्रातून संबंधित निवेदनांचा आणि समितीने केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ही निवेदने पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाकडे, बेंगळूर येथे पाठविण्यात आल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

बेंगळूरमध्येही विद्यार्थ्यांचा पाठपुरावा

दरम्यान, बेंगळूर येथे अधिवेशनाच्या काळात डीएड आणि बीएड विद्यार्थ्यांनी संबंधित मंत्री तसेच लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शिक्षक भरतीचा प्रश्न उपस्थित केला होता. या पाठपुराव्यानंतर मराठी माध्यमासाठी २०० आणि उर्दू माध्यमासाठी ८०० जागांचा प्रस्ताव मान्य झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, मराठी माध्यमासाठी २०० जागा अपुऱ्या असून ८०० ते ९०० शिक्षकांच्या जागा मंजूर कराव्यात, अशी पात्र उमेदवारांची मागणी आहे. मराठी माध्यमाच्या जागांमध्ये वाढ करण्यासाठीही पाठपुरावा सुरू आहे.

सुधारित अधिसूचनेकडे लक्ष

जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने समितीच्या निवेदनांची दखल घेऊन ती राज्याच्या शिक्षण विभागाकडे पाठवल्याने मराठी भाषिक आणि शिक्षक भरतीसाठी पात्र डीएड, बीएड उमेदवारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

आता मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या जागांमध्ये वाढ करून सुधारित अधिसूचना कधी जारी होणार, याकडे सीमाभागातील मराठी भाषिकांसह हजारो पात्र उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

“मराठी विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार. शासनाने केवळ प्रस्ताव न ठेवता प्रत्यक्ष मराठी माध्यमाच्या जागा वाढवून सुधारित अधिसूचना काढावी,” अशी भूमिका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर समितीने व्यक्त केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.