बेळगाव लाईव्ह: समाजासाठी निस्वार्थपणे काम करणारे हात, कलेला समृद्ध करणारी मने, क्रीडाक्षेत्रात जिद्दीने नावलौकिक मिळविणारे खेळाडू, उद्योगातून रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक आणि शेतीत नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी… अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या बेळगावच्या नऊ कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा ‘नवरत्न’ म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.
श्री माता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, श्री भक्ती महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, श्री राजमाता महिला मल्टीपर्पज सोसायटी आणि ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री गणेश फेस्टिवल बेळगाव’ अंतर्गत बुधवार, 9 सप्टेंबर 2026 रोजी नवरत्नांचा सत्कार आणि गणेश फेस्टिवलचा सांगता सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यंदा विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी कार्याची दखल घेत नऊ मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. समाजसेवेतील योगदानासाठी अवधूत तुडवेकर यांना ‘समाजसेवकरत्न’, साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी शोभा नायक यांना ‘साहित्यरत्न’, तर सामाजिक क्षेत्रात कार्यरत समर्पण युथ फाऊंडेशनला ‘सामाजिक संस्थारत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
याशिवाय आपल्या श्रमातून समाजाला हातभार लावणाऱ्या आशा पत्रावळी यांना ‘श्रमसेवारत्न’, संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल अशोक परांजपे यांना ‘संगीतरत्न’, क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी ललिता गवस यांना ‘क्रीडारत्न’ आणि कला क्षेत्रातील योगदानासाठी अजित औरवाडकर यांना ‘कलारत्न’ म्हणून सन्मानित केले जाणार आहे.

उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आयडियल प्रॉडक्टला ‘उद्योगरत्न’, तर कृषी क्षेत्रातील योगदानासाठी राजू मर्वे यांना ‘कृषिरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
समाजातील विविध स्तरांवर आपल्या कार्याने सकारात्मक बदल घडविणाऱ्या या ‘नवरत्नां’चा गौरव हा केवळ पुरस्कार नसून त्यांच्या कार्याची समाजाकडून घेतलेली दखल आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि समाजात चांगले काम करण्याची ऊर्मी निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
सत्कार समारंभ बुधवार, 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता श्रीमाता सोसायटी सभागृह, न्यू गुड शेड रोड, बेळगाव येथे होणार आहे. याच कार्यक्रमातून यंदाच्या श्री गणेश फेस्टिवलची सांगता होणार आहे.





