बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील रस्त्यांवरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी लोकोळी क्रॉस–तोपिनकट्टी मार्गावर झालेल्या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी रात्री खानापूर–लोंढा मार्गावरील माणिकवाडी क्रॉसजवळ दुचाकी आणि ट्रकच्या धडकेत आणखी दोन जणांचा बळी गेला.
मंगळवारी रात्री माणिकवाडी क्रॉसजवळ दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार युवराज शत्रुघ्न माळिक (३०) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी मोहिनी युवराज माळिक (२५), रा. जटगे, ता. खानापूर, या गंभीर जखमी झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
गंभीर जखमी मोहिनी माळिक यांना तातडीने खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांनाही मृत घोषित केले.
सलग दोन दिवसांत चार मृत्यू
खानापूर तालुक्यातील रस्ते अपघातांचे गांभीर्य या सलग दोन दिवसांतील घटनांमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे. सोमवारी लोकोळी क्रॉस–तोपिनकट्टी मार्गावर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक होऊन २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता. गंभीर जखमी झालेल्या त्याच्या वडिलांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर अवघ्या एका दिवसात माणिकवाडी क्रॉसजवळ झालेल्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला.
सलग दोन दिवसांत चार जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने खानापूर तालुक्यातील प्रमुख मार्गांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जटगे गावावर शोककळा
युवराज आणि मोहिनी माळिक हे दोघेही खानापूरहून दुचाकीवरून जटगे गावाकडे जात असताना हा अपघात झाला. धडक एवढी भीषण होती की युवराज यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी मोहिनी यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहेत. घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात झाली असून, अपघाताच्या कारणांचा आणि ट्रकचालकाच्या भूमिकेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सलग दोन दिवसांत झालेल्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याने खानापूर तालुक्यात शोककळा पसरली असून, प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.





