बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तपदाची नुकतीच सूत्रे स्वीकारलेले प्रकाश निकम यांची मंगळवारी विविध भागांतील लोकप्रतिनिधी, माजी उपमहापौर, माजी नगरसेवक-नगरसेविका, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवरांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नूतन पोलीस आयुक्तांचे स्वागत करण्यात आले.
सदिच्छा भेटीदरम्यान बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था तसेच वाढता अमली पदार्थांचा धोका यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः युवा पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असल्याबद्दल उपस्थितांनी गंभीर चिंता व्यक्त केली.
युवा पिढीच्या भवितव्याचा प्रश्न
शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणांपर्यंत अमली पदार्थांचे जाळे पोहोचत असल्याचे उपस्थितांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. अमली पदार्थांच्या व्यसनामुळे केवळ संबंधित युवकाचे आयुष्य उद्ध्वस्त होत नाही, तर त्याचा गंभीर परिणाम कुटुंबावर आणि पुढे संपूर्ण समाजव्यवस्थेवर होतो. त्यामुळे या समस्येवर तातडीने आणि कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात तसेच शहरातील संवेदनशील ठिकाणी विशेष पोलीस गस्त, नियमित तपासणी आणि प्रभावी नियंत्रण यंत्रणा राबवावी. अमली पदार्थांची विक्री व पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून या साखळीचा छडा लावावा, अशी मागणी करण्यात आली.
पोलीस-पालक-शैक्षणिक संस्थांचा समन्वय हवा
अमली पदार्थांविरोधातील लढा केवळ पोलिसांच्या कारवाईपुरता मर्यादित न ठेवता पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांना सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृतीबरोबरच संवेदनशील परिसरात विशेष पथके तैनात करावीत आणि संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे, अशी मागणीही करण्यात आली.
बोरसे यांच्या काळातील उपक्रमांचा संदर्भ
यावेळी माजी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या कार्यकाळातील अमली पदार्थविरोधी उपक्रमांचा संदर्भ देण्यात आला. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या अशाच एका भेटीत बेळगावला व्यसनमुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून अमली पदार्थांविरोधात विविध उपक्रम आणि कारवाया राबविण्यात आल्या.
त्याच धर्तीवर नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनीही अमली पदार्थांविरोधात कठोर आणि सातत्यपूर्ण मोहीम राबवून बेळगाव शहराला व्यसनमुक्त करण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
मोबाईलच्या अतिवापराबाबतही मार्गदर्शन
विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या मोबाईलच्या अतिवापराबाबतही यावेळी चर्चा झाली. लहान मुले, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन युवक मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या वापराकडे आकर्षित होत असून त्याचा त्यांच्या अभ्यासासह शारीरिक हालचाली आणि सामाजिक जीवनावर परिणाम होत असल्याचे आयुक्त प्रकाश निकम यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी अनावश्यक मोबाईलचा वापर कमी करून क्रीडा, मैदानी उपक्रम, अभ्यास आणि सर्जनशील कार्यात अधिक सहभागी व्हावे, यासाठी पालक व शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
नागरिकांच्या सहकार्याने सुरक्षित बेळगाव
अमली पदार्थांचा वाढता धोका, युवकांचे भवितव्य, शैक्षणिक परिसराची सुरक्षा, वाहतूक, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता अशा विविध विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढल्यास बेळगाव अधिक सुरक्षित आणि व्यसनमुक्त करण्यासाठी प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी उपस्थितांच्या सूचना व मागण्या सकारात्मकपणे ऐकून घेतल्या. शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी रमाकांत कोंडुस्कर, रमेश पावले, रणजित चव्हाण पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, रेणू मुतकेकर, विकास कलघटगी, माजी नगरसेवक-नगरसेविका राजू बिरजे, सुधा भातकांडे, शिवाजी कुडुचकर, मनोहर हलगेकर, वैशाली हुलजी, विजय भोसले, सागर पाटील, संजय पाटील, मोतेस बारदेशकर, कपिल भोसले, प्रशांत भातकांडे, महेश मुतकेकर यांच्यासह विविध भागांतील प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.
“बेळगाव शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कठोर व प्रभावी पावले उचलावीत. या मोहिमेत नागरिक आणि विविध सामाजिक संस्था पोलीस प्रशासनाच्या पाठीशी राहतील,” असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.





