belgaum

कित्तूर उत्सवाच्या आयोजनाला वेग; स्थानिक कलाकारांना प्राधान्य, पशुमेळा-उद्यानविद्या प्रदर्शने

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : ऐतिहासिक कित्तूर उत्सवाच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत उत्सवाचे स्वरूप, सांस्कृतिक कार्यक्रम, कलाकारांची निवड, निधी, क्रीडा स्पर्धा तसेच विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी पोलीस आयुक्त प्रकाश निकम, आमदार असिफ शेठ, आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

स्थानिक कलाकारांना यंदा प्राधान्य

कित्तूर उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी दरवर्षी राज्याबाहेरील तसेच मुंबईसारख्या शहरांमधून प्रसिद्ध कलाकारांना मोठ्या मानधनावर आमंत्रित केले जाते. मात्र यंदा या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 belgaum

स्थानिक कलाकारांना अधिकाधिक संधी देण्यावर भर देण्यात येणार असून, बाहेरील कलाकारांची संख्या कमी केली जाणार आहे. त्याचबरोबर कर्नाटकातील कलाकार आणि इतर राज्यांतील निवडक कलाकारांचा समतोल साधण्याचा विचार आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनीही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलाकारांना प्राधान्य देतानाच कर्नाटकातील आणि बाहेरील कलाकारांचा योग्य समतोल साधण्याचा सल्ला दिला. पहिल्या दोन दिवसांत कर्नाटकातील कलाकारांना संधी आणि तिसऱ्या दिवशी राज्याबाहेरील एखाद्या प्रमुख कलाकाराला आमंत्रित करण्याबाबत त्यांनी भूमिका मांडली.

उद्घाटनाची पद्धत बदलणार

आतापर्यंत पालकमंत्र्यांच्या हस्ते कित्तूर उत्सवाचे उद्घाटन केले जात होते. मात्र यंदा या पद्धतीत बदल करण्याचा विचार आहे. साहित्यिक, बुद्धिजीवी किंवा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

उद्घाटनासाठी अशी व्यक्ती निवडली जावी, जिच्यामुळे नागरिकांना आकर्षण वाटेल आणि सर्वांना प्रेरणा मिळेल, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

पशुमेळा आणि उद्यानविद्या प्रदर्शनाचा नवीन उपक्रम

कित्तूर उत्सवाला केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता त्यामध्ये कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित उपक्रमांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा पशुमेळा आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच बेळगावमध्ये लोकप्रिय ठरणाऱ्या उद्यानविद्या विभागाच्या प्रदर्शनाच्या धर्तीवर कित्तूरमध्येही उद्यानविद्या प्रदर्शन भरवण्याचा विचार आहे. या माध्यमातून शेतकरी आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

चर्चासत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणार

कित्तूर उत्सवादरम्यान सकाळच्या चर्चासत्रांना अपेक्षित प्रमाणात नागरिकांची उपस्थिती नसते. त्यामुळे या चर्चासत्रांचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

चांगले वक्ते उपलब्ध असतानाही उपस्थिती कमी राहू नये यासाठी विद्यार्थ्यांना सकाळपासून विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. चर्चासत्रातील वक्त्यांमध्येही यंदा बदल करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

५ कोटींच्या निधीत उत्सवाचे भव्य आयोजन

कित्तूर उत्सवासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून, त्यातून उत्सव भव्य स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. आवश्यकता भासल्यास अतिरिक्त निधीची मागणी केली जाईल. भविष्यात दरवर्षी उत्सवाच्या निधीत वाढ करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

यंदा किमान ५० लाख रुपयांची अतिरिक्त वाढ करून क्रीडा स्पर्धा आणि कलाकारांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

मागील उत्सवातील सुमारे ३० लाख रुपयांची शिल्लक रक्कम यंदाच्या आयोजनात समायोजित करण्याबाबतही चर्चा झाली.

मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी कित्तूर-खानापूरपुरते आयोजन

बेळगाव शहरातील जिल्हा मैदानावर झालेल्या मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या धर्तीवर यंदा कार्यक्रम घेण्याबाबतही चर्चा झाली. मात्र असा कार्यक्रम मागील वेळी कित्तूरच्या २०० वर्षांच्या विशेष सोहळ्याचा भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यंदा उत्सवाचे कार्यक्रम कित्तूर आणि खानापूर परिसरापुरते मर्यादित ठेवण्यात येणार आहेत.

एअर शोसाठीही प्रयत्न

मागील कित्तूर उत्सवात झालेल्या सैन्याच्या एअर शोची पुनरावृत्ती यंदा करण्याबाबतही चर्चा झाली. मात्र त्यासाठी केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच आमदारांकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री समारोपाला उपस्थित राहणार

मुख्यमंत्री उद्घाटनासाठी उपस्थित राहणार नसून उत्सवाच्या शेवटच्या दिवशी उपस्थित राहतील, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. मागील वर्षी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उत्सवाला उपस्थित होते.

एकूणच, यंदाचा कित्तूर उत्सव स्थानिक कलाकार, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग वाढवून अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.