बेळगाव लाईव्ह: शहरातील चव्हाट गल्ली परिसरातील ढोर गल्ली येथे घडलेल्या भीषण अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनेची माहिती घेत पीडित कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले.
यावेळी पोलीस आयुक्त प्रकाश निकम, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, उत्तरचे आमदार असिफ सेठ, महापौर प्रीती खामकर, मनपा आयुक्त एम. कार्तिक, उपमहापौर तसेच भाजप नेते किरण जाधव यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास घराला आग लागल्याने ही दुर्घटना घडली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून, आणखी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संपूर्ण बेळगाव शहरावर शोककळा पसरली आहे.
फॉरेन्सिक पथकाकडून पाहणी
आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू असून घटनास्थळी फॉरेन्सिक विशेष तज्ज्ञांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. आगीमागचे नेमके कारण तसेच दुर्घटनेला कोणाची जबाबदारी आहे, हे तपास अहवालानंतर स्पष्ट होईल, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार ही दुर्घटना आगीमुळे घडल्याचे दिसत असले, तरी पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच कारण स्पष्ट होईल. तपास अहवालात कोणाची चूक असल्याचे समोर आल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याची भूमिका सरकारची असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पीडितांना तातडीच्या मदतीसाठी चर्चा
दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांना शक्य ती मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करण्यात येईल. उपचाराचा खर्च, झालेली हानी आणि कुटुंबीयांना भविष्यात आवश्यक असलेली मदत याबाबत सरकारच्या पातळीवर चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे जारकीहोळी यांनी सांगितले.
असुरक्षित घरांचा प्रश्न ऐरणीवर
ढोर गल्लीसारख्या परिसरात अनेक कुटुंबे असुरक्षित घरांमध्ये राहत असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. या कुटुंबांना सुरक्षित घरे उपलब्ध करून देण्यासाठी घरकुल योजनांमध्ये प्राधान्य देण्याबाबत सरकारकडे सूचना केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
शहरी भागातील अशा कुटुंबांसाठी घरकुल योजनांचा लाभ मिळण्यास विलंब होऊ नये, यासाठी स्वतंत्र प्राधान्य किंवा आरक्षणाच्या माध्यमातून मदत करण्याचा विचार केला जाईल. यासंदर्भात महापौर, उपमहापौर, आमदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दुर्घटनेमुळे ढोर गल्ली परिसरात शोकाकुल वातावरण असून, पीडित कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.





