बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या चव्हाट गल्ली परिसरातील ढोर गल्ली येथे मध्यरात्री सुमारे २.३० वाजता भीषण अग्निकांड घडले. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार महिलांचा होरपळून मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेनंतर पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि माध्यमांना घटनेची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, शारदा दमोने, प्रिया दमोने, गंगा दमोने आणि भारती दमोने या चार महिलांचा आगीत भाजल्याने जागीच मृत्यू झाला. तर गजानंद दमोने आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गजानंद दमोने हे सुमारे ८० टक्के, तर त्यांच्या मुलाला सुमारे ४० टक्के भाजल्याचे निकम यांनी सांगितले.
चारही मृतदेहांचे शवविच्छेदन सुरू असून, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आगीचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही. याबाबत पोलीस आयुक्त प्रकाश निकम म्हणाले की, घटनास्थळी FSL टीमला पाचारण करण्यात आले असून HESCOM अधिकाऱ्यांकडूनही तपासणी सुरू आहे. प्राथमिक पाहणीत शॉर्ट सर्किटचा संशय दिसत असला, तरी FSL अहवाल आल्यानंतरच आगीचे नेमके कारण निश्चित होईल. फ्रिजमधून स्फोटासारखा आवाज आल्याचे जखमी मुलाने सांगितल्याची माहितीही निकम यांनी दिली.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर विद्यमान आमदार असिफ शेठ यांनी पहाटेच कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत दमोने कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच पीडित कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर माजी आमदार अनिल बेनके यांनीही घटनास्थळी भेट देऊन दमोने कुटुंबीयांचे आणि नातेवाईकांचे सांत्वन केले. या कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी, तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी बेनके यांनी केली.
एकीकडे चार महिलांच्या मृत्यूने परिसरावर दुःखाचे सावट पसरले आहे, तर दुसरीकडे जखमी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्या उपचारांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, FSL आणि HESCOMच्या तपासानंतरच या भीषण आगीमागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.





