बेळगाव लाईव्ह : हुबळी येथे ऊसाला योग्य दर मिळावा आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आणि विविध शेतकरी संघटनांच्या वतीने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कर्नाटकातील सूर्यफूल, मूग आणि सोयाबीन या पिकांची किमान आधारभूत किमतीने (एमएसपी) खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे पत्र प्रल्हाद जोशी यांना पाठवले आहे.
प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी किंमत आधार योजना (पीएसएस) अंतर्गत तीन पिकांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे.
केंद्रीय कृषिमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रानुसार, कर्नाटकातून १३,४१३ मेट्रिक टन सूर्यफूल, ३८,२५० मेट्रिक टन मूग आणि १,१५,५०० मेट्रिक टन सोयाबीनची किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यात येणार आहे.
काळ्या हरभऱ्याच्या (उडीद) खरेदीचा प्रस्ताव मात्र बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा खाली आल्यास योजनेच्या पात्रतेच्या अटींनुसार विचारात घेतला जाईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सूर्यफूल आणि मूग पिकांचे बाजारभाव अनुक्रमे प्रतिक्विंटल ८,३४३ रुपये आणि ८,७८० रुपये या निर्धारित किमान आधारभूत किमतींपेक्षा कमी असल्याचे प्रल्हाद जोशी यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. हंगामात आवक वाढल्यानंतर दर आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी किंमत आधार योजना लागू करण्याची मागणी केली होती.

या मंजुरीमुळे संबंधित पिकांच्या उत्पादक शेतकऱ्यांना आधार मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, हुबळीत सुरू असलेल्या आंदोलनात ऊसदरासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात येत असून, या मागण्यांवर सरकारकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सूर्यफूल, मूग आणि सोयाबीन खरेदीसाठी मिळालेली मंजुरी हा प्रल्हाद जोशी यांच्या पत्रव्यवहारातून पुढे आलेला निर्णय आहे. ऊसदराच्या मागणीसंदर्भातील आंदोलन आणि या मंजुरीचा थेट संबंध असल्याचे पत्रात नमूद नाही.





