belgaum

राकसकोप येथे निवृत्त जवान विष्णू मोटर यांचा भव्य सत्कार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : भारतीय सैन्यदलात तब्बल २६ वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेले एसीपी नायब सुभेदार विष्णू भरमू मोटर यांचा राकसकोप येथील ग्रामस्थ, पंचमंडळ, ग्रामपंचायत सदस्य, सैनिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

शनिवार, ८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमानिमित्त विष्णू मोटर यांची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘जय जवान, जय किसान’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. त्यानंतर गावातील सामाजिक भवन येथे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला.

अपघातात दोन्ही पाय निकामी, तरीही सेवा पूर्ण

सैन्यसेवेत असताना दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान झालेल्या वाहन अपघातात विष्णू मोटर यांचे दोन्ही पाय निकामी झाले. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी खचून न जाता जिद्द आणि धैर्याने आपली उर्वरित सेवा पूर्ण केली.

 belgaum

“विष्णू मोटर यांची जिद्द आणि देशसेवेची तळमळ आजच्या युवकांसमोर प्रेरणादायी उदाहरण आहे,” असे मनोगत एम. के. पाटील यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामस्थ पंचकमिटीचे अध्यक्ष विलास बाबू पाटील होते.

सहकाऱ्यांकडून जुन्या आठवणींना उजाळा

सत्कारप्रसंगी निवृत्त सैनिक अधिकारी मनोहर पाटील यांनी विष्णू मोटर यांच्या सैन्यसेवेतील जिद्द, शिस्त आणि तळमळीचे विविध प्रसंग सांगत त्यांचे कौतुक केले.

वर्गमित्रांच्या वतीने सत्कार करताना अजित मोरे यांनी विष्णू यांच्यासोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी १९ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट आणि १७ मद्रास रेजिमेंटमधील निवृत्त जवानांनीही आवर्जून उपस्थित राहून विष्णू मोटर यांचा सत्कार केला.

देशभक्तीने भारले वातावरण

गावातील आजी-माजी सैनिक, युवक, ‘एक दिवस गावासाठी’ टीमचे सदस्य, नागरिक आणि ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी विष्णू मोटर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचाही गौरव करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमामुळे संपूर्ण राकसकोप गावात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्त सुभेदार मेजर केदारी मोटर यांनी केले. सूत्रसंचालन निवृत्त शिक्षक गुंडू जानबा शिवणगेकर यांनी केले. शेवटी निवृत्त सैनिक शिवाजी मोटर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.