belgaum

रेशन वितरणाच्या सर्व्हर समस्येने दुकानदार, नागरिक त्रस्त

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (रेशन) सर्व्हरच्या गंभीर तांत्रिक समस्येमुळे रेशन दुकानदारांसह लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका लाभार्थ्याचा अंगठा घेऊन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तब्बल १५ ते २० मिनिटांपासून एक तासापर्यंत वेळ लागत असल्याचा आरोप रेशन दुकानदारांनी केला आहे.

राज्यभर रेशनची उचल उशिराने झाल्याने महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही अनेक रास्तभाव दुकानांमध्ये अद्याप रेशनचा माल पोहोचलेला नाही. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली सर्व्हरची समस्या पुन्हा गंभीर झाल्याने दुकानदार आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

याबाबत सरकारी रेशन दुकानदार संघटनेच्या बेळगाव जिल्हा विभागाच्या वतीने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभागाचे बेळगावचे उपसंचालक मलिकार्जुन नायक यांना निवेदन देण्यात आले. सर्व्हरची समस्या तातडीने दूर करून नागरिकांना सुरळीतपणे रेशन वितरणाची व्यवस्था करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

 belgaum

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजशेखर तळवार यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांच्या इतिहासात एवढी गंभीर सर्व्हर समस्या कधीच पाहायला मिळाली नाही. काही ठिकाणी एका लाभार्थ्याचे कार्ड करण्यासाठी तब्बल एक तास लागत असल्याने दिवसभरात मोजक्याच लाभार्थ्यांना रेशन वितरित करता येत आहे.

दुकानदार सकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्रीपर्यंत दुकान सुरू ठेवत असतानाही सर्व्हरच्या समस्येमुळे व्यवहार होत नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे नागरिकांमध्ये दुकानदारांविषयी गैरसमज निर्माण होत असून, प्रत्यक्षात सर्व्हरच्या तांत्रिक समस्येमुळे रेशन वितरण रखडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ई-केवायसीची प्रक्रिया आणि सर्व्हरवरील वाढता ताण यामुळे समस्या आणखी गंभीर झाल्याचा दावा दुकानदारांनी केला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत सर्व्हरची समस्या सोडवून रेशन वितरण सुरळीत न केल्यास बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील रास्तभाव दुकान मालकांच्या वतीने अहोरात्र धरणे सत्याग्रह सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

यावेळी बेळगाव जिल्हा व तालुक्यातील अनेक रेशन दुकानदार उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.