बेळगाव लाईव्ह : जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा केल्याचा आरोप असलेल्या शिवम असोसिएट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) शिवानंद नीलण्णावर यांना शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठा दणका दिला. बेळगावातील शिवबसव नगर येथील त्यांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली.
या प्रकरणात यापूर्वी बड्स (BUDS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून, सध्या सीआयडीकडून तपास सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईडीनेही स्वतंत्र कारवाई करत तपासाची व्याप्ती वाढवली आहे.
धाडीदरम्यान शिवानंद नीलण्णावर यांची पत्नी संगीता तसेच जावई संजू यांची ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. या कारवाईत मंगळुरू आणि गोवा येथील ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक सहभागी झाले असून, निवासस्थानातील कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदींची तपासणी करण्यात आली.

याशिवाय, शिवानंद नीलण्णावर यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवरही ईडीने छापे टाकले. बेळगाव जिल्ह्यातील बडकुंद्री येथील निवासस्थान तसेच चिक्कोडी येथील सुभाष यांच्या घराचीही झडती घेण्यात आली.
या प्रकरणात यापूर्वी १५ मे रोजी बेळगावचे सहाय्यक आयुक्त (एसी) यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्यात कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि पुढील तपासासाठी प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले. सीआयडीचा तपास सुरू असतानाच ईडीच्या धाडीमुळे या बहुचर्चित प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.





