belgaum

बेळगावात कंत्राटी वसतिगृह कर्मचाऱ्यांचे आंदोलन

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज कर्नाटक राज्य सरकारी वसतिगृह आणि निवासी शाळा कंत्राटी कर्मचारी संघाच्या (AIAWU) वतीने भव्य आणि आक्रमक आंदोलन छेडण्यात आले.

आज सकाळपासूनच बेळगावात संततधार पाऊस सुरु असतानाही आंदोलकांचा उत्साह कमी झाला नव्हता. भर पावसात हातात छत्र्या आणि संघटनेचे फलक घेऊन शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. “आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत”, “किमान वेतन लागू करा” अशा जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

या प्रसंगी बोलताना संघटना प्रतिनिधी आणि आंदोलकांनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. “वर्षानुवर्षे तुटपुंज्या मानधनावर राबणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकार सतत दुर्लक्षित करत आहे. आम्ही जिवाची रान करून सेवा बजावत असतानाही आम्हाला हक्काचे वेतन आणि सेवा सुरक्षा मिळत नाही. शासनाने आमचे शोषण थांबवून नवीन किमान वेतन तातडीने लागू करावे, अन्यथा हा लढा अधिक तीव्र केला जाईल,” असा इशारा आंदोलकांनी दिला.

 belgaum

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कामगार विभागाने २२ मे २०२६ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार नवीन किमान वेतन ५ जून २०२६ आणि १० जुलै २०२६ च्या आदेशान्वये तत्काळ लागू करण्याची मुख्य मागणी करण्यात आली आहे. तसेच वसतिगृहे व निवासी शाळांमधील स्वयंपाकी, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर आणि कंत्राटी शिक्षकांना सेवा सुरक्षा पुरवणे, दरमहा ५ तारखेच्या आत पगार जमा करणे, पीएफ (PF), ईएसआय (ESI) सुविधा देणे आणि निवृत्तीनंतर १० लाख रुपयांची भरपाई देणे या मागण्यांचा समावेश आहे.

या आंदोलनात जिल्हा प्रधान सचिव लक्ष्मण कांबळे, राज्य सहसचिव प्रदीप दळवाई (तळवार), चन्नप्पा कुंभार, कुणाल सुतके, श्रीकांत सन्नक्की, होसबसप्पा कुंभार, द्वारका यद्दलमुडी, कमला घंटी, मायाप्पा शाबाणी, महावीर कांबळे, रवे कांबळे, आनंद माळवाळे, आनंद पाटील, धर्मा महेशवाडगी, महेश नेसरगी, तसेच लघमण्णा हरिजण, भैरराव माने, राजेश कोळी, संगीता गुजरनट्टी, राजू म्यारेन्नवर, जया बागेवाडी, सुरेश बेविनकट्टी, शिवक्का होन्नूर आणि मुबारका नदाफ यांच्यासह शेकडो कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.