बेळगाव लाईव्ह:
वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त सध्या विविध वारांचे आयोजन करण्यात येत असून, मंगळवारच्या वारानिमित्त देवीसमोर दुष्काळाचे वास्तव आणि आगामी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीचा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. या अनोख्या आरासचे दर्शन घेण्यासाठी तसेच देवीच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी मोठी गर्दी केली.
यंदा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे प्रभावी चित्रण या देखाव्यातून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या वेदना आणि निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीचे वास्तव भाविकांसमोर मांडण्यात आले.
यासोबतच, येत्या शनिवारी येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी आणि पंढरपूर वारीचा भक्तिमय देखावा देवीसमोर उभारण्यात आला आहे. दुष्काळाचे वास्तव आणि भक्तीचा संदेश यांचा सुंदर संगम या आरासीत पाहायला मिळत आहे.

मंगळवार हा श्री मंगाई देवीचा विशेष वार मानला जात असल्याने सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी रीघ लागली होती. देवीचे दर्शन घेताना अनेक भक्तांनी राज्यात लवकर चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे आणि सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली.
यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वारांची माहिती आणि देवीसमोरील विशेष आरासाबाबत विनायक चव्हाण पाटील यांनी माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मंगाई देवीची यात्रा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.





