बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील कुपटगिरी (बरगाव)ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सन २०२२ मध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत माजी ग्रामपंचायत सदस्या तथा चार्टर्ड अकाउंटंट पद्मश्री पाटील यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पद्मश्री पाटील यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत त्यांनी २०२२ मध्ये लोकायुक्त आणि जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, चार वर्षे उलटूनही या तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने त्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी प्रलंबित तक्रारींची सद्यस्थिती तपासून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.

याशिवाय, गेल्या पाच वर्षांत ग्रामपंचायतीत झालेल्या विकासकामांचाही आढावा घेऊन त्याची स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणी त्यांनी केली. गावाच्या विकासासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना पद्मश्री पाटील म्हणाल्या, “भ्रष्टाचाराविरोधातील आमचा लढा सुरूच राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून निष्पक्ष चौकशीचे आदेश द्यावेत. दोषींवर कारवाई झाल्यास नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक बळकट होईल.”
आता जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन या प्रकरणात कोणती भूमिका घेतात आणि चौकशीबाबत कोणते निर्णय होतात, याकडे कुपटगिरीसह संपूर्ण खानापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.





