बेळगाव लाईव्ह : प्रस्तावित बंगळुरू–मुंबई स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ही तुमकूर–दावणगेरे–हुबळी–बेळगाव–पुणे मार्गे चालवावी, अशी मागणी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पुन्हा केली आहे. यासंदर्भात २२ जुलै २०२६ रोजी त्यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवून सध्याच्या प्रस्तावित मार्गाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे.
सध्या रेल्वे मंत्रालयाने बंगळुरू–मुंबई स्लीपर वंदे भारत कलबुर्गी–सोलापूर–पुणे–मुंबई मार्गे चालविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, उत्तर कर्नाटकातील औद्योगिक, शैक्षणिक आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या भागांना न्याय देण्यासाठी ही गाडी हुबळी आणि बेळगावमार्गे धावणे आवश्यक असल्याचे शेट्टर यांनी पत्रात नमूद केले आहे.
खासदार शेट्टर यांनी या मार्गावर मोठी औद्योगिक केंद्रे, संरक्षण आणि एरोस्पेस उद्योग, नामांकित शैक्षणिक संस्था, कृषी क्षेत्र तसेच कर्नाटकाचे ‘साखर भांडार’ म्हणून ओळखला जाणारा बेळगाव जिल्हा असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात विविध राज्यांतून रुग्ण उपचारासाठी येत असल्याने या मार्गाचे महत्त्व अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगावमार्गे स्लीपर वंदे भारत सुरू झाल्यास उत्तर कर्नाटकातील नागरिकांना मोठा लाभ होईल आणि संतुलित प्रादेशिक विकासालाही चालना मिळेल, असे शेट्टर यांनी म्हटले आहे.

यापूर्वीही त्यांनी अनेक वेळा ही मागणी लावून धरली होती. तसेच बेळगाव–बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
दरम्यान, उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवासी संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांनीही बेळगावमार्गे स्लीपर वंदे भारत चालविण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. मात्र, भारतीय रेल्वेकडून अद्याप प्रस्तावित मार्गात कोणताही बदल जाहीर करण्यात आलेला नाही.





