बेळगाव लाईव्ह : अमली पदार्थांच्या जाळ्यातून मुक्त होऊन तरुणांनी निरोगी आयुष्य जगावे आणि कुटुंब व देशरक्षणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन बेळगावचे जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. बेळगाव येथील संगोळ्ळी रायाण्णा प्रथम दर्जा महाविद्यालयात पोलीस विभागाच्या वतीने आयोजित ‘बेडा ब्रो’ ही विशेष मोहीम म्हणजेच अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
देशातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या आहारी ढकलून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात असून, यावर नियंत्रण मिळवणे हे देशापुढील मोठे आव्हान बनले आहे. सरकारकडून विविध स्तरांवर प्रयत्न होत असतानाही अनधिकृत मार्गाने अमली पदार्थांची तस्करी सुरूच आहे. तरुणाई ही देशाची संपत्ती असल्याने त्यांनी अमली पदार्थांच्या क्षणिक आकर्षणाला बळी न पडता दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर या संकटाचा सामना केला पाहिजे. कोणताही थेट संघर्ष न करता देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याची ताकद अमली पदार्थांमध्ये आहे. त्यामुळे युवकांनी आपली ऊर्जा सकारात्मक कामांमध्ये लावून व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी सहकार्य करावे. तसेच शिक्षण, शिस्त आणि चांगल्या संस्कारांचा अवलंब करावा. अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासन, शिक्षण संस्था, पालक आणि नागरिकांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन सतीश जारकीहोळी यांनी केले.
आमदार आसिफ सेठ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून लांब राहिले तरच ते आपले ध्येय साध्य करू शकतात. अमली पदार्थांच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे राजू सेठ यांनी म्हटले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिष्ठेचा विषय न बनवण्याचा सल्ला दिला. तरुण पिढी कोणत्याही भीतीशिवाय व्यसनांच्या आहारी जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. या समस्येविरोधात तरुणांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे सांगत त्यांनी एका शायरीच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी माहिती दिली की, राज्यभरात सुरू असलेल्या ड्रग्जमुक्त अभियानाचा भाग म्हणून बेळगाव जिल्ह्यातही ही विशेष मोहीम तीव्र करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये हे जनजागृती अभियान राबवले जाणार आहे. गेल्या वर्षी अमली पदार्थांशी संबंधित ४९ गुन्हे दाखल करून ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तरुणांनी या व्यसनापासून दूर राहावे आणि अशी कोणतीही बेकायदेशीर कृत्य आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, अशी विनंती भूषण बोरसे यांनी केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले की, शत्रू राष्ट्रे भारतीय तरुणांना अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढून देश कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात असून, या अवैध धंद्यातून मिळणारा पैसा देशविरोधी कारवायांसाठी वापरला जातो. त्यामुळे तरुणांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे के. रामराजन यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. त्यागराज, कुलसचिव संतोष कामगौडा यांच्यासह पोलीस अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी ‘बेडा ब्रो’ आणि ‘राईस’ या अभियानावर आधारित लघुपट दाखवण्यात आले.




