बेळगाव लाईव्ह : कॅम्प परिसरातील युनियन जिमखाना येथे झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणाची बेळगाव शहर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणातील आरोपींवर गुंडा ॲक्ट तसेच तडीपारी (हद्दपारी) सारखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिला. या घटनेनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असून, पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.
कॅम्प येथील युनियन जिमखाना क्लबमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या प्रयत्न प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी दोन विशेष तपास पथके (SIT) स्थापन केली आहेत. ही पथके वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगावसह शेजारच्या महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि चंदगड परिसरात छापेमारी करत असून, आरोपींची पार्श्वभूमी, आर्थिक व्यवहार आणि हल्ल्यामागील नेमका हेतू याचाही तपास सुरू आहे.
दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिला गुन्हा जळगार गल्ली येथील रहिवासी सुरेश जळगार यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रफुल पाटील आणि चार ते पाच अज्ञात साथीदारांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुसरा गुन्हा युनियन जिमखानाचे व्यवस्थापक यांनी दाखल केला असून, आरोपींनी बेकायदेशीररित्या क्लबमध्ये प्रवेश करून तेथील मालमत्तेची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटना कशी घडली?
पोलीस तक्रारीनुसार, मंगळवारी रात्री आरोपींचा गट युनियन जिमखानामध्ये घुसला आणि “सुरेश जळगार कुठे आहेत?” अशी विचारणा करू लागला. आरोपींपैकी एकाच्या मोबाईलमध्ये सुरेश जळगार यांचा फोटो असल्याचेही समोर आले आहे. फोटोच्या आधारे त्यांची ओळख पटवून आरोपींनी त्यांच्यावर मारहाण केली. त्यानंतर एका आरोपीने त्यांच्यावर पिस्तूल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर जिमखान्यात एकच गोंधळ उडाला. उपस्थित नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. या गोंधळाचा फायदा घेत सुरेश जळगार तेथून निसटले आणि थेट कॅम्प पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

जुन्या वैमनस्य आणि आर्थिक वादाचा संशय
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी सुरू असून दोन विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वैमनस्यातून आणि आर्थिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, गेल्या वर्षी सुरेश जळगार आणि त्यांच्या साथीदारांनी प्रफुल पाटील यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याच वैमनस्याचे रूपांतर या सशस्त्र हल्ल्यात झाल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.
सीसीटीव्ही फुटेज जप्त; महाराष्ट्रातही छापेमारी
घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलीस उपायुक्त एन. व्ही. बर्माणी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला.
पोलिसांनी जिमखाना आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी बेळगावसह महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि चंदगड परिसरात छापेमारी सुरू असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.





