belgaum

झाडे, वीज खांब आणि घरांच्या पडझडीचे सत्र सुरु !

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात मान्सूनच्या पहिल्याच पावसात ठिकठिकाणी वृक्षांची पडझड सुरू झाली असून, अनेक भागांत वीज खांब उन्मळून पडले आहेत. आज दुपारी एकच्या सुमारास खासबाग येथील उप्पार गल्लीत एक अतिशय जुने चिंचेचे झाड कोसळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेत दोन घरांचे आणि मंदिराचे मोठे नुकसान झाले असून दोन नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, उप्पार गल्लीतील लोहार कुटुंबाच्या घराच्या मागील बाजूस असलेले हे चिंचेचे झाड सुमारे २०० वर्षे जुने होते. आज दुपारी हे झाड अचानक समोरच्या बाजूला कोसळले. या झाडाखाली असलेले ब्रह्मदेव मंदिर पूर्णपणे दुभांगले असून शेजारी राहणारे अनिल मुतकेकर यांच्या घराची संरक्षण भिंतही कोसळली आहे.

झाड समोर पडल्यामुळे आनंद भादवनकर, एकनाथ भादवनकर आणि प्रशांत गोरले यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्घटना घडली तेव्हा याचठिकाणी एक महिला घरकामात व्यस्त होती, मात्र ती सुदैवाने बचावली. या घटनेत एकनाथ भादवनकर यांच्या पायाला दुखापत झाली असून अन्य एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही.

 belgaum

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची छाटणी करणे गरजेचे असताना, हेस्कॉम आणि वनविभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळेच हा अपघात घडल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. शहरात पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे आणि आपल्या परिसरातील अशी जुनी, धोकादायक झाडे तात्काळ महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून द्यावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.