belgaum

त्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक वकील हिंसाचार प्रतिबंधक कायदा पायदळी तुडवून अथणी (जि. बेळगाव) येथील वकील ॲड. मल्लिकार्जुन कोरी यांच्याशी असभ्य वर्तन करून त्यांची बदनामी करण्याबरोबरच त्यांना मारहाण करणाऱ्या अथणीचे पोलीस उपनिरीक्षक आणि संबंधित कॉन्स्टेबल्सना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

बेळगाव बार असोसिएशन अर्थात वकील संघटनेतर्फे अध्यक्ष ॲड. बी. जे. गंगाई व सरचिटणीस ॲड. सचिन शिवन्नवर यांच्या नेतृत्वाखाली वकिलांनी आज गुरुवारी सकाळी उपरोक्त मागणीचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून ते तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाकडे धाडण्याचे आश्वासन दिले.

वृत्तपत्र व प्रसिद्धी माध्यमांकडून असे समजते की गेल्या 30 मे 2026 रोजी बुरानसाब यात्रा उत्सवादरम्यान सत्ती गावात दोन गटांमध्ये झालेली जातीय दंगल शमवण्यासाठी अथणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उप्पार आणि त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सत्ती गावाला भेट दिली.

 belgaum

त्यावेळी दंगली जखमी झालेल्यांना बाळकृष्ण क्लिनिकमध्ये नेण्यात आले होते. त्यावेळी सदर क्लिनिकला लागूनच, वकील ॲड. मल्लिकार्जुन कोरी हे त्यांच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक उप्पार आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी बाळकृष्ण क्लिनिकसमोरील जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज सुरू केला. त्यावेळी पोलिसांनी ॲड. कोरी यांना शिवीगाळ करून त्यांची बदनामी करण्यास सुरुवात केली.

तसेच त्यांच्या कॉलरला पकडून धमकावण्यास सुरुवात केली. जेव्हा ॲड. कोरी यांनी आपण वकील असून जातीय दंगलीत अजिबात भाग घेतला नसल्याचे सांगून विरोध केला, तेंव्हा पोलीस उपनिरीक्षक उप्पार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे न ऐकता त्यांना लाथा मारल्या आणि वकिली व्यवसायाची बदनामी केली. सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहे. संबंधित घटनेवरून वकिलांच्या विनंतीला काहीही किंमत नाही आणि नुकताच लागू झालेला ‘कर्नाटक वकील हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2024’ आधारे सरकारी यंत्रणा वकिलांना न्याय आणि संरक्षण देण्यात अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होते.

याची दखल घेण्याबरोबरच अथणी येथील उपरोक्त घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पत्नीचे पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल्सविरुद्ध कठोर कारवाई केली जावी. त्यांना निलंबित केले जावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. पवन पाटील, ॲड. जयश्री मंड्रोळी, संयुक्त सचिव ॲड. प्रशांत पाटील आदींसह बहुसंख्य वकील उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.