बेळगाव लाईव्ह : बेळगावसह संपूर्ण कर्नाटक राज्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच ‘व्हिजन कर्नाटक’ महाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, देशात किंवा परदेशात जिथे कुठे जाईल तिथे बेळगावसाठी काय नवीन आणता येईल, याचाच मी सातत्याने विचार करत असतो, असे प्रतिपादन खासदार जगदीश शेट्टर यांनी केले.
खासदार जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वाखाली, दिल्ली येथील ‘प्रयास एक्झिबिशन’च्या वतीने केएलई सोसायटीच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘द्वितीय व्हिजन कर्नाटक’ महाप्रदर्शनाच्या शानदार उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी मंचावर विधान परिषदेचे आमदार हनुमंत निरानी, माजी खासदार मंगला अंगडी, माजी आमदार संजय पाटील, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष गीता सुतार, संरक्षण मंत्रालयाचे मुख्य महाव्यवस्थापक बी. एस. रेड्डी, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे संचालक एन. नंदगोपाल आदी मान्यवर उपस्थित होते.

या महाप्रदर्शनाला पहिल्याच दिवशी तब्बल ८ हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी भेट दिली. शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानापासून ते इस्रोच्या अंतराळ मोहिमांपर्यंतच्या विविध देशाभिमान वाढवणाऱ्या सरकारी योजना एकाच छताखाली पाहून बेळगावकर थक्क झाले.
हे प्रदर्शन पुढील दोन दिवस (बुधवार आणि गुरुवार) सर्व नागरिकांसाठी मोफत खुले असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता देसाई यांनी केले तर प्रयास संस्थेचे अध्यक्ष वनीश गुप्ता यांनी आभार मानले.




