बेळगाव लाईव्ह : लग्न समारंभात परवानगीशिवाय कर्कश आवाजात साउंड सिस्टीम लावून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी काकती पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. ही घटना १३ मे रोजी बेळगाव जवळील सुळगा (हिंडलगा) गावात घडली.
काकती पोलीस ठाणे यांना मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम लावून नागरिकांना त्रास दिला जात होता. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला असता, लग्न समारंभासाठी आवश्यक परवानगी न घेता कर्कश डीजेचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले.
या प्रकरणी कौतुक बळराम काकतकर (रा. टिळकवाडी), सिद्धार्थ विठ्ठल कोलाप (रा. सांगली, महाराष्ट्र), परशुराम यल्लाप्पा पाटील (रा. लक्ष्मी गल्ली, सुळगा) आणि भरत गुंडू कुडचीकर (रा. ब्रह्मलिंग गल्ली, सुळगा) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या आवाजातील साउंड सिस्टीममुळे परिसरातील लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच रुग्णांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे भारतीय न्याय संहिता (BNS-2023) कलम २९२, १२५ सह ३(५) तसेच कर्नाटक पोलीस कायदा १९६३ अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
भाग्यनगर, येळ्ळूर येथे दोघा मटका बुकिंना अटक
बेळगाव शहरातील भाग्यनगर आणि येळ्ळूर गावातील हणमंतगौडानगर येथे मटका जुगाराचे आकडे येणाऱ्या दोघा मटका बुकिंना काल बुधवारी पोलिसांनी काल अटक केली.
अटक केलेल्या आरोपींची नावे आनंद बसप्पा होन्नळ्ळी (वय 65, रा. नाझर कॅम्प वडगाव बेळगाव) आणि सागर पांडुरंग कुंडेकर (वय 38, प्रताप गल्ली येळ्ळूर बेळगाव) अशी आहेत. त्यापैकी आनंद हा काल भाग्यनगर 9व्या क्रॉस जवळ सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी आकडे घेऊन लोकांचे पैसे जुगारावर लावत होता. त्यावेळी टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून आरोपीला रंगेहात पकडले. त्याचप्रमाणे सागर हा येळ्ळूर गावातील हणमंतगौडानगर येथे सार्वजनिक ठिकाणी लोकांचे पैसे जुगारावर लावत असताना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीला पकडून अटक केली. दोघाही आरोपींकडून जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी टिळकवाडी व बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.





