बेळगाव लाईव्ह : ज्या नागरिकांच्या जाती प्रमाणपत्रात चुकीची माहिती नमूद केली गेली आहे ती तात्काळ दुरुस्त करून योग्य जाती प्रमाणपत्र देण्यात यावे आणि प्रमाणपत्रात चुकीची माहिती नमूद करणाऱ्या संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन श्री नामदेव दैवकी संस्था बेळगावतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
1बेळगाव शहरातील श्री नामदेव दैवकी संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सादर केलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या (डीसी) गैरहजेरीत त्यांच्या सहाय्यकांनी स्वीकारले. तसेच मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरेने आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. जाती प्रमाणपत्रात चुकीची माहिती नमूद केल्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास, मनस्ताप याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे संबंधित व्यक्तींच्या जाती प्रमाणपत्रामधील चुका तात्काळ दुरुस्त करून त्यांना योग्य प्रमाणपत्र वितरित केले जावे. जाती प्रमाणपत्र तयार करताना कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जावी.
भविष्यात या पद्धतीने चुका होणार नाहीत याची काळजी घेण्याची कडक सूचना सर्व तालुका कार्यालयांना दिली जावी. नागरिकांच्या धार्मिक आणि सांप्रदायिक अस्मितेशी निगडित दाखले काळजीपूर्वक तपासणी करून वितरित केले जावेत यासाठी मार्गदर्शक सूची तयार केली जावी आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहेत.
निवेदन सादर करतेवेळी विनोद भागवत, निरंजन बोंगाळे, अजित कोकणे, नेत्रावती भागवत, नारायण काकडे, सुरेश पिसे, प्रमोद काकडे, नामदेव हावळ, सुष्मिता खटावकर, हरीश चिकोर्डे, रविकांत पिसे, संजय हावळ आदी उपस्थित होते.





