बेळगाव लाईव्ह : रामदुर्गमधील झोपडपट्टी विकास मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या घरकुल योजनेत बोगस कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा निधी हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी झोपडपट्टी विकास मंडळाच्या कार्यालयावर धडक छापा टाकला. या कारवाईमुळे रामदुर्गमधील प्रशासकीय वर्तुळात आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
रामदुर्ग शहरात शासकीय योजनेअंतर्गत ६०० घरांची निर्मिती करण्यात आल्याचे कागदपत्रांवर दाखवण्यात आले होते. मात्र, अनेक लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात स्वतःचे पैसे खर्च करून ही घरे बांधली असल्याचे लोकायुक्तांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. लाभार्थ्यांनी स्वतःच्या हिमतीवर घरे बांधली असताना, अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराशी संधान साधून ही घरे सरकारी निधीतून बांधल्याचे खोटे रेकॉर्ड तयार केले आणि कोट्यवधी रुपयांचा निधी लाटला. शासकीय योजनांच्या नावाखाली चालणाऱ्या या छुप्या भ्रष्टाचाराचे धागेदोरे शोधण्यासाठी लोकायुक्त पोलिसांनी आता कंबर कसली आहे.
या घोटाळ्याच्या मुळाशी जाण्यासाठी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी केवळ मुख्य कार्यालयावरच नव्हे, तर संबंधित कंत्राटदार आणि साहाय्यक अभियंत्यांच्या निवासस्थानांवर तसेच खाजगी कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकले. या मोहिमेदरम्यान संशयितांच्या घरातून आणि कार्यालयातून अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे, बँक व्यवहारांच्या नोंदी आणि बांधकाम विषयक संशयास्पद संचिका जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढवली असून, यात आणखी काही वरिष्ठ अधिकारी आणि मध्यस्थांचा सहभाग असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.





