belgaum

पॉक्सोप्रकरणी आरोपीला 30 वर्षे सश्रम कारावास

0
289
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कित्तूरमधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधमाला बेळगावमधील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र विशेष जलदगती पॉक्सो न्यायालयाने ३० वर्षे सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. इम्रान रियाज अहमद चौधरी (२९) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कित्तूरमधील कसाई गल्लीत राहणाऱ्या इम्रानने शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिने एका बालकाला जन्म दिला. या गंभीर प्रकरणी पीडितेच्या पालकांनी कित्तूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गांगोल यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, तर सीपीआय शिवानंद गुडगनट्टी यांनी प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी अभियोक्ता एल. व्ही. पाटील यांनी ८ साक्षीदार आणि ४८ महत्त्वाचे दस्तऐवज सादर करून आरोपीचा गुन्हा सिद्ध केला.

 belgaum

न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी इम्रान चौधरीला पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत दोषी ठरवले. त्याला ३० वर्षांच्या कारावासासह १ लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त २ वर्षांच्या शिक्षेचे आदेश दिले आहेत.

पीडित मुलीच्या भविष्यासाठी आणि पुनर्वसनासाठी जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाकडून ५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. ही रक्कम पुढील पाच वर्षांसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.