belgaum

मुतगे गावात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

0
751
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील मुतगे गावात ‘मारग मळणे’ हा पारंपारिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनानंतर गावाच्या सीमेवरील मळ्यात सामूहिक परड्या भरण्यासाठी मोठ्या संख्येने गावातील भाविकांनी हजेरी लावली होती.

मुतगे गावातील भाविक सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावरून परतल्यानंतर मळ्यामध्ये ‘मारग मळणे’ हा विधी पार पडला. या उत्सवापूर्वी दहा ते बारा दिवस गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाच वर्षांनंतर येणाऱ्या श्री लक्ष्मी देवीच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी श्री लक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पूर्ण केला.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर भालचंद्र पाटील यांनी माहिती दिली की, दरवर्षीप्रमाणे सौंदत्ती यात्रेनंतर गावाच्या सीमेवर मळ्यातील यात्रा भरते. पूर्वी हा सोहळा उन्हात पार पडत असे, मात्र ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष भाऊ पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून लोकसहभागातून येथे भव्य शेड उभारण्यात आले आहे. कंत्राटदार आणि ग्रामस्थांच्या देणगीतून केवळ १५ ते २० दिवसांत हे काम पूर्ण झाले असून, यासाठी भालचंद्र पाटील, किरण पाटील, सुधीर पाटील आणि प्रभाकर पाटील यांनी पुढाकार घेतल्याचे भालचंद्र पाटील यांनी सांगितले.

 belgaum

ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष भाऊ पाटील यांनी यात्रेच्या स्वरूपावर प्रकाश टाकला. गेल्या तीन दिवसांपासून हा उत्सव सुरू असून, हनुमान जयंती, कुस्ती स्पर्धा आणि आंबील गाड्यांची मिरवणूक अशा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी गावाने उत्सवाचा आनंद लुटला. सौंदत्तीहून परतलेल्या महिलांनी सामूहिकरीत्या परड्या भरून देवीचा आशीर्वाद घेतल्याचे भाऊ पाटील यांनी नमूद केले.

दर पाच वर्षांनी साजरी होणारी लक्ष्मी देवीची जयंती यंदा सामाजिक उपक्रमांनी साजरी झाली. या निमित्ताने गावातील ब्रह्मदेव मंदिर, भावकेश्वरी मंदिरासह सर्व प्रमुख मंदिरांना रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. देणगीदारांच्या मदतीने हे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने यात्रेच्या सांगता समारंभात सर्व देणगीदारांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याला देवस्थान समिती, ग्राम सुधारणा मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि मुतगे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.