बेळगाव लाईव्ह :मलेशियास्थित ॲटलांटा कार समूहाचे डायरेक्टर परशराम कोलेकर यांनी पुढाकार घेत, खानापूर तालुक्यात कॉमर्स विभागात बारावी परीक्षेत टॉपर ठरलेल्या कु. सबीना लोबो हिचा सत्कार करून तिला आर्थिक मदत प्रदान केली.
खानापूर तालुक्यातील म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या सबीना लोबो हिने 600 पैकी तब्बल 590 गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत साध्या कुटुंबातील असलेल्या सबीनाचे वडील गवंडी कामगार असून, आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा प्रतिकूल परिस्थितीतही तिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर हे यश मिळवले.
विशेष म्हणजे कोणत्याही खासगी शिकवणीचा आधार न घेता, केवळ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून सबीनाने ही कामगिरी केली आहे. तिच्या या यशाची दखल घेत उद्योजक परशराम कोलेकर यांनी तिच्या कर्तृत्वाचा गौरव करत तिला रोख 11 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.

ताराराणी महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांच्याशी संपर्क साधून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. सबीनाच्या घरी जाऊनच हा सन्मान करण्यात आला, ज्यामुळे तिच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
या प्रसंगी प्रा. पी. व्ही. कर्लेकर, प्रा. टी. आर. जाधव, प्रा. एन. ए. पाटील, प्रा. नितीन देसाई, प्रा. सी. एस. कणबरकर, प्रा. वनिता गावडे, प्रा. जे. एफ. शिवठणकर, प्रा. एम. वाय. देसाई तसेच हरसनवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सबीना लोबो हिचे हे यश संपूर्ण खानापूर तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत असून, प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन करता येते, हे तिच्या कर्तृत्वातून स्पष्ट झाले आहे.





