belgaum

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी आरोपीला ३० वर्षांची कोठडी

0
472
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील एका अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार केल्याचा ठपका ठेवत बेळगावमधील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने (विशेष पॉक्सो न्यायालय-१) आरोपीला ३० वर्षांच्या कठीण कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गोकाक तालुक्यातील लोळसूर येथील रहिवासी शिवानंद बसवराज डोणी याने एका अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते. त्याने पीडितेला बळ्ळारीसह विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.

या प्रवासादरम्यान त्याने पीडितेच्या दागिन्यांची विक्री करून तो पैसा स्वतःसाठी खर्च केल्याचेही तपासात समोर आले आहे. याप्रकरणी घटप्रभा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला यांनी या प्रकरणाचा तपास करून बेळगावमधील विशेष पॉक्सो न्यायालयासमोर दोषारोपपत्र सादर केले. न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी या प्रकरणाची सुनावणी केली.

 belgaum

सुनावणीदरम्यान एकूण १८ साक्षीदार, ५० कागदपत्रे आणि ३ वस्तूंच्या आधारे आरोपी शिवानंद डोणी याच्यावर आरोप सिद्ध झाले.

न्यायालयाने त्याला पॉक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत ३० वर्षांची कठीण कारावासाची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी २ वर्षांची शिक्षा भोगावी लागेल, असे न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी निकालात म्हटले आहे. तसेच, पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ही रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत ५ वर्षांसाठी मुदत ठेवीत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी या प्रकरणात प्रभावी युक्तिवाद केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.