belgaum

इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून तरुणीची फसवणूक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सोशल मीडियावरील ओळख आणि त्यातून निर्माण झालेली मैत्री एका तरुणीसाठी अत्यंत भयानक ठरली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केले आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळल्याची धक्कादायक घटना बेळगावच्या शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये एस पी एम रोड दुसरा क्रॉस येथील रहिवासी ईश्वरसिंग प्रेमसिंग भाटी याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पीडित तरुणीशी ओळख वाढवली. सुरुवातीला मैत्री आणि नंतर प्रेमाचे नाटक करून त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला. लग्नाचे आश्वासन देऊन त्याने तरुणीवर शारीरिक अत्याचार केले आणि तिचे काही खाजगी क्षण चोरून कॅमेऱ्यात कैद केले.

या खाजगी फोटोंचा आणि व्हिडिओंचा वापर करून आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पीडितेच्या वडिलांनी मालमत्ता विकून आलेले ८ लाख रुपये न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. इतकेच नव्हे तर, नोकरीचे प्रलोभन दाखवून त्याने पीडितेच्या वडिलांच्या मुदत ठेवीतील (FD) पैसेही खर्च करायला लावले. अशा प्रकारे आतापर्यंत सुमारे ७ लाख रुपये रोख आणि १५० ग्रॅम सोन्याचे दागिने आरोपीने उकळल्याचे समोर आले आहे.

 belgaum

या प्रकरणी पीडितेने पुराव्यासह शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐजी ‘आपसात तडजोड करा’ असा सल्ला दिल्याने पीडितेने संताप व्यक्त केला आहे. “आरोपीने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले असून त्याचे कुटुंबीय आता लग्नासाठी ३ कोटी रुपयांची मागणी करून उलट आम्हालाच धमकावत आहेत,” असा आरोप पीडितेने केला आहे.

पीडितेच्या वकील मंदाकिनी अप्पुगोळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. “ईश्वरसिंगने तरुणीवर अत्याचार करून तिची आर्थिक लूट केली आहे. अशा गुन्हेगाराला तात्काळ अटक होणे गरजेचे आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना तरुणींनी सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी ईश्वरसिंग प्रेमसिंग भाटी याला शहापूर पोलिसांनी सोमवारी अटक केली. पीडित तरुणीने पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.