बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत मटका जुगार खेळवणाऱ्या एकाला आणि अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हिरेबागेवाडी, एपीएमसी आणि मार्केट पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बसवराज मटगार यांनी हिरेबागेवाडी-बसापूर रस्त्यावर छापा टाकून हुसेन बबनसाब जिहादूर याला अटक केली.
हुसेन हा सार्वजनिक ठिकाणी ‘कल्याण मटका’ जुगार खेळवत असताना आढळला. पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम आणि मटका साहित्य जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.
अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात एपीएमसी आणि मार्केट पोलिसांनी शहरात विशेष मोहीम राबवली. एपीएमसी पोलिसांनी अभिषेक दौलत पाटील आणि विलास शंकर बाळेकुंद्री यांना ताब्यात घेतले. तर मार्केट पोलिसांनी विजय संजय कवीलकर, उत्कर्ष सुनील वर्मा आणि हर्ष सुनील वर्मा यांना अटक केली. वैद्यकीय तपासणीत या सर्वांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या सर्व कारवाया पोलीस उपनिरीक्षक एस. के. होळन्नवर, विठ्ठल हावन्नवर आणि हुसेनसाब केरूूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल बेळगाव पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी पथकाचे कौतुक केले आहे.





