belgaum

बेळगावमध्ये 16 पासून भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मृती अ. भा. क्रिकेट स्पर्धा

0
806
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक दलित संघर्ष समिती भीम वादी आणि जय भीम युवक मंडळ, कंग्राळ गल्ली बेळगाव यांच्यातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त येत्या गुरुवार दि. 16 एप्रिल 2026 पासून ‘महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर ट्रॉफी -2026’ या भव्य बक्षीस रकमेच्या अखिल भारतीय खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी दिली.

बेळगाव शहरात आज शुक्रवारी सकाळी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. उपरोक्त राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धा शहरातील सरदार मैदानावर खेळविली जाणारा आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास 2,55,555 रुपये व करंडक आणि उपविजेत्या संघास 1,55,555 रुपये व चषक अशी बक्षिसे दिली जाणारा असून या व्यतिरिक्त उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर, मालिकावीर अशी आकर्षक वैयक्तिक पारितोषिके देखील पुरस्कृत करण्यात आली आहेत.

स्पर्धेसंदर्भात बोलताना आमदार असिफ सेठ यांनी सांगितले की, बेळगावमध्ये येत्या 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त एका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. तेंव्हा शहर परिसरातील हौशी क्रिकेट संघांनी या स्पर्धेत भाग घ्यावा आणि क्रीडाशौकिनांनी देखील मोठ्या संख्येने स्पर्धेला उपस्थित राहून ती यशस्वी करण्यास सहकार्य करावे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तीने आपल्या देशाला संविधान दिले आहे.

 belgaum

त्यांच्या स्मरणार्थ आयोजित आमच्या क्रिकेट स्पर्धेच्या करंडकाचे अनावरण 14 एप्रिल रोजी केले जाणार असून त्यानंतर 15 एप्रिलपासून प्रदर्शनीय क्रिकेट सामन्याने स्पर्धेला प्रारंभ होईल. शाळा -महाविद्यालयांचा उन्हाळ्याच्या सुट्टीचा हंगाम सुरू होत आहे. या हंगामात त्यांनी खेळावर लक्ष केंद्रित करून आपली शारीरिक तंदुरुस्ती वाढवावी या उद्देशाने ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जात आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मल्लेश चौगुले, सिद्राय मेत्री वगैरे मंडळी तयारीला लागली आहेत. आपल्याला आरक्षण, समानता, आत्मसन्मान मिळवून देणाऱ्या संविधानाचे निर्माते डॉ. आंबेडकर यांचे सर्वांनी कायम स्मरण ठेवले पाहिजे.

यासाठी भारतीय संस्कृतीनुसार वर्षभर विविध कार्यक्रम -उपक्रम राबवले जाणार आहेत. त्या अनुषंगाने क्रिकेट स्पर्धेबरोबरच दि. 27, 28 व 29 एप्रिल रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण फक्त त्यांच्या जयंती दिवशी करून चालणार नाही, त्यांचे दररोज स्मरण करणे हीच त्यांनी केलेल्या कार्याला वाहिलेली खरी आदरांजली असेल असे सांगून क्रिकेट स्पर्धेसह अन्य सर्व कार्यक्रम हा राजकारणाचा भाग नसून डॉ. आंबेडकरांचे स्मरण आहे, असे आमदार असिफ सेठ यांनी शेवटी स्पष्ट केले. याप्रसंगी युवा नेते अमान सेठ, मल्लेश चौगुले, सिद्राय मेत्री आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.