बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या प्रशासकीय बैठकीत आज शहरातील रखडलेली विकासकामे, ड्रेनेजची दुरवस्था आणि हेस्कॉमच्या ढिसाळ कारभारावरून नगरसेवकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जनसामान्यांच्या प्रश्नांवरून लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.
बैठकीच्या सुरुवातीलाच नगरसेविका रेश्मा भैरकदार यांनी ड्रेनेज समस्येवरून तीव्र संताप व्यक्त केला. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून, पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
याच मुद्द्याला दुजोरा देत नगरसेवक रियाज किल्लेदार यांनी मन्नत कॉलनीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत असल्याची तक्रार केली. यावर महापौरांनी केवळ कागदोपत्री उत्तरे न देता अधिकाऱ्यांनी तातडीने नगरसेवकांसोबत घटनास्थळी जाऊन ही समस्या मार्गी लावावी, असे कडक आदेश दिले.
शहरातील वीज यंत्रणा आणि स्मार्ट सिटीच्या कामांबाबतही बैठकीत जोरदार चर्चा झाली. नगरसेवक राजू भातकांडे यांनी माहिती दिली की, या प्रभागात स्मार्ट सिटी अंतर्गत बसवण्यात येणारे ३७ ओव्हरहेड पोल अद्याप प्रलंबित असून हेस्कॉमने कामाच्या दरम्यान काढलेले पोल पुन्हा बसवण्यास विलंब होत आहे. तसेच हेस्कॉमचे कर्मचारी झाडांच्या फांद्या तोडल्यानंतर तो कचरा तिथेच टाकून जातात, ज्यामुळे स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. यावर उपाय म्हणून नगरसेवक रवी साळुंके यांनी वॉर्डनिहाय विशेष पथक स्थापन करण्याची मागणी केली, जेणेकरून महिन्यातून एकदा तरी अधिकाऱ्यांनी नगरसेवकांशी चर्चा करून स्थानिक समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. वीज पुरवठा खंडित झाल्यास महापालिकेची हेल्पलाईन कार्यान्वित नसल्याचा आरोप नगरसेविका वीणा विजापूरे आणि राजशेखर ढोणी यांनी केला, ज्यामुळे नागरिकांना उत्तर देणे कठीण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीत २०१६ पासून प्रलंबित असलेल्या भूमिगत केबल्सच्या मुद्द्यावरूनही नगरसेवक रवी धोत्रे आणि संदीप जिरग्याळ यांनी प्रशासनाला धारेवर धरले. जवळपास ८० टक्के काम पूर्ण असताना केवळ २० टक्के कामासाठी ही योजना रखडली असून नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच एल अँड टी कंपनीच्या कामामुळे सिडी वर्कचे नुकसान होऊन कलमठ रोडवरील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा मुद्दा जयतीर्थ सवदत्ती यांनी उपस्थित केला.
राष्ट्रीय महामार्गालगतचे खड्डे बुजवण्याबाबतची उदासीनता आणि नागरी सुविधांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल स्थायी समिती अध्यक्षा लक्ष्मी राठोड आणि नामनिर्देशित सदस्य दिनेश नाशिपुडी यांनी नाराजी व्यक्त केली. अखेर, सर्व तक्रारींची दखल घेत महापौरांनी प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आणि तातडीने कार्यवाही अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.
या बैठकीला सत्ताधारी पक्षाचे नेते संतोष पेडणेकर, महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, सर्व प्रभागातील नगरसेवक, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.





