बेळगाव लाईव्ह :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि श्री शिवजयंती या दोन महत्त्वाच्या उत्सवांदरम्यान कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी बेळगाव शहर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या जयंतींना शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवल्या जात असून त्या अनुषंगाने आज शहरात ठिकठिकाणी विशेष करून संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि श्री शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. तसेच शहरातील प्रमुख चौक, मिरवणूक मार्ग आणि धार्मिक स्थळांवर पोलिस फौजफाटा तैनात करण्याबरोबरच विशेष करून मिरवणूक मार्ग व संवेदनशील भागात सीसीटीव्ही निगराणी वाढविली जाणार आहे.

त्या अनुषंगाने आज शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू असल्याचे पहावयास मिळत होते. हे कॅमेरे 24 तास निगरानी ठेवतील आणि सर्व फुटेज पोलीस नियंत्रण कक्षाला जोडले जाणार आहे.
या कॅमेऱ्यांमुळे जयंती दरम्यान होणारे कोणतेही गैरप्रकार किंवा नियम उल्लंघन कॅमेऱ्यांमध्ये कैद होईल. याचा थेट फायदा पोलीस तपास प्रक्रियेला होणार आहे. याशिवाय, ड्रोनद्वारे हवाई निगराणी, व्हिडिओ रेकॉर्डिंग युनिट्स आणि क्राईम ब्रँच पथकेही तैनात केली जाणार आहेत.





