belgaum

शतकोत्तर परंपरेला विलंबाचा विळखा आणि शिस्तीचे आव्हान

0
234
Shiv jayanti procession
 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगावची शिवजयंती म्हणजे केवळ एक उत्सव नसून, ती सीमाभागातील मराठी अस्मितेचा आणि शिवभक्तीचा महाकुंभ आहे. १०८ वर्षांची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या या मिरवणुकीचे आकर्षण सातासमुद्रापार पोहोचले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या ऐतिहासिक सोहळ्याला विलंबाचा आणि नियोजनाच्या अभावाचा मोठा फटका बसत असल्याचे दाहक वास्तव समोर आले आहे.

मिरवणुकीच्या दिवशी दुपारी ४:३० च्या सुमारास पालखी पूजन होऊन सोहळ्याला अधिकृत प्रारंभ होतो. मात्र, प्रत्यक्षात चित्ररथ मुख्य मिरवणूक मार्गावर येण्यासाठी रात्रीचे १० वाजतात. अनेक मंडळे आपला देखावा ‘पीक अवर’मध्ये सादर केला जावा, या अट्टहासापोटी वेळेत मिरवणुकीत दाखल होत नाहीत. मंडळांमधील या चढाओढीमुळे मिरवणुकीची साखळी तुटते आणि सोहळा लांबत जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत सुरू राहतो. यामुळे महिनाभर तालीम करून सजीव देखावे सादर करणाऱ्या शेकडो कलाकारांचा उत्साह मावळतो आणि रात्रभर जागून मिरवणूक पाहणाऱ्या हजारो शिवभक्तांचा मोठा हिरमोड होतो.

मिरवणुकीच्या विलंबाचा परिणाम केवळ उत्साहावरच नाही, तर शहराच्या जनजीवनावर आणि अर्थव्यवस्थेवरही होत आहे. शिवजयंतीच्या दिवशी सकाळपासूनच मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जातात. यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावी लागतात.

 belgaum

जर मिरवणूक वेळेत, म्हणजे पहाटेपर्यंत संपली, तर दुसऱ्या दिवशी व्यापार सुरळीत होऊ शकतो; मात्र सोहळा लांबल्याने सलग दोन दिवस आर्थिक व्यवहार ठप्प राहतात, ज्याचा फटका लहान व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसतो. या विलंबासोबतच मिरवणुकीत शिरलेली ‘डॉल्बी संस्कृती’ ही सर्वात मोठी चिंतेची बाब ठरली आहे. सजीव देखाव्यांच्या संवादापेक्षा डॉल्बीचा कानठळ्या बसवणारा आवाज मोठा असल्याने, कलाकारांनी महिनाभर घेतलेली मेहनत वाया जाते. दवाखाने आणि संवेदनशील भागातही काही मंडळे आवाजाची मर्यादा पाळत नसल्याने रुग्ण आणि वयोवृद्धांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

बेळगावच्या शिवजयंतीची ओळख ही ‘सजीव देखावे’ आणि ‘ऐतिहासिक शुद्धता’ ही आहे. मात्र, अलिकडे उपनगरातून येणाऱ्या काही मंडळांमुळे या परंपरेला वरातीचे स्वरूप प्राप्त होत आहे. शिवकालीन पराक्रमाचे दर्शन घडवण्याऐवजी, हिडीस नृत्य, अश्लील हालचाली आणि व्यसनाधीनतेचे प्रकार मिरवणुकीत वाढले आहेत. टिळकवाडी, कॅम्प यांसारख्या भागातून येणारी काही नवीन मंडळे पारंपरिक वाद्यांना बगल देऊन केवळ धिंगाणा करण्यावर भर देत आहेत.

यामुळे ज्या मूळ उद्देशासाठी ही मिरवणूक सुरू झाली, तो उद्देशच बाजूला सारला जात आहे. जर ऐतिहासिक संदर्भांऐवजी केवळ गोंगाटच उरणार असेल, तर या १०८ वर्षांच्या परंपरेचे पावित्र्य कसे टिकणार, असा प्रश्न सुज्ञ शिवभक्तांमधून उपस्थित केला जात आहे.

आता वेळ आली आहे ती केवळ आवाहने करण्याची नाही, तर कडक अंमलबजावणीची. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ आणि पोलीस प्रशासनाने संगनमताने चित्ररथांसाठी ‘वेळमर्यादा’ निश्चित करणे अनिवार्य आहे. जे मंडळ वेळेत येणार नाही, त्यांना मिरवणुकीत प्रवेश नाकारणे किंवा त्यांचा क्रम मागे टाकणे, असे कठोर निर्णय घेतल्याशिवाय ही मिरवणूक शिस्तबद्ध होणार नाही.

तसेच, डॉल्बीवर पूर्णपणे बंदी घालून पारंपरिक झांज पथके, ढोल-ताशा आणि लेझीम पथकांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. गोवा आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांना बेळगावचे ‘शिवकालीन वैभव’ पाहायचे आहे, ‘डिस्को’ नव्हे. त्यामुळे, ही ऐतिहासिक परंपरा जिवंत ठेवण्यासाठी आणि तिचा दर्जा जागतिक पातळीवर टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक मंडळाने आत्मपरीक्षण करणे आणि प्रशासनाने ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवणे, हीच काळाची गरज आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.