belgaum

लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला कारावासाची शिक्षा

0
509
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली बेळगावच्या विशेष जलदगती पोक्सो न्यायालयाने आरोपीला ३० वर्षांच्या सक्तमजुरीची कठोर शिक्षा सुनावली आहे. कल्लाप्पा परशुराम सुतार (वय २२, रा. नंदगड, ता. खानापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर एप्रिल २०२५ मध्ये खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एल. एच. गौंडी यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी या खटल्याची सुनावणी घेतली, ज्यामध्ये सरकारी पक्षाने ११ साक्षीदार आणि ७६ कागदोपत्री पुरावे सादर करून आरोपीवरील दोष सिद्ध केले.

न्यायालयाने आरोपीला ३० वर्षांच्या कारावासासोबतच १ लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त २ वर्षांच्या कारावासाची तरतूद केली आहे. तसेच, पीडित मुलीच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही रक्कम मुलीच्या भविष्यासाठी ५ वर्षांपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवली जाणार आहे. या संवेदनशील प्रकरणात विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी सरकारतर्फे प्रभावी युक्तिवाद केला.

 belgaum

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपीला कारावासाची शिक्षा

बेळगाव लाईव्ह: शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची सतत छेड काढून तिला मानसिक त्रास देणाऱ्या आरोपीला बेळगावच्या विशेष जलदगती पोक्सो न्यायालयाने ३ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

प्रदीप नंदेश ऊर्फ नंदू बंडीवड्डर (वय २३, रा. नंदेम्मा नगर, बैलहोंगल) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३० डिसेंबर २०२४ रोजी बैलहोंगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी पीडित मुलगी शाळेला जाता-येताना तिचा रस्ता अडवून तिला हातवारे करून त्रास देत असे, तसेच विरोध केला असता तिच्या कुटुंबीयांनाही धमकावले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गुरुराज कलबुर्गी यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी १० साक्षीदार आणि १३ महत्त्वाच्या कागदपत्रांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला ३ वर्षांच्या कारावासासह १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच, पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून १ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले असून, ही रक्कम ५ वर्षांसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या खटल्यात विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी सरकारतर्फे युक्तिवाद केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.