बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात अवैध मद्यविक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. मारीहाळ आणि उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये पोलिसांनी हजारो रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला असून संबधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मारीहाळ पोलिसांनी खनगाव बी.के. गावातील गोकाक रस्त्यावरील महालक्ष्मी धाब्यावर छापा टाकला. यावेळी परवान्याशिवाय अवैध मद्यविक्री करताना संतोष सुरेश पाटील (३१, रा. आदर्श नगर, संकेश्वर) याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून सुमारे १४,३६५ रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून मारीहाळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या एका कारवाईत मारीहाळ पोलिसांनी निळजी गावाच्या हद्दीतील गावकरी धाब्यामागील शेडवर छापा टाकला. यावेळी सांबरा येथील सौरभ आनंद धर्म हा अनधिकृतपणे दारू विकताना आढळला. पोलिसांना पाहताच आरोपी फरार झाला, मात्र घटनास्थळावरून ६,५५० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती एएसआय आर. एम. तळवार यांनी दिली.
तसेच उद्यमबाग पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या धीरज बसप्पा हुबळी (३६, रा. पार्वती नगर) याच्यावर कारवाई केली. चन्नम्मा नगर येथील डबल रोडवर बेकायदा मद्यसेवन करत असताना पी. जी. गंडव्वगोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अबकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण २१,०२५ रुपये किमतीची ६४.८० लिटर अवैध दारू जप्त केली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांनी (डीसीपी) संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
बेळगावात मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चार जणांना अटक
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात बेकायदेशीर मटका आणि जुगार अड्ड्यांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. मार्केट आणि उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर आणि त्यांच्या पथकाने जुन्या भाजी मार्केटमधील इंदिरा कॅन्टीन परिसरात छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या तीन आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. यामध्ये लक्ष्मण विरूपाक्षी कणबर्गी (२६, रा. समर्थ नगर), कासिम रजाक सय्यद (२५, रा. जुना गांधीनगर) आणि पंकज मोहन जाधव (रा. कामत गल्ली) यांचा समावेश आहे. या तिघांविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या एका कारवाईत, उद्यमबाग पोलिसांनी बेळगाव-पीरणवाडी रस्त्यावरील बालाजी काट्याजवळ छापा टाकला. यावेळी सार्वजनिक ठिकाणी मटका घेताना भीमप्पा यल्लाप्पा शिवप्पगोळ (५२, रा. मार्कंडेय नगर) याला ताब्यात घेण्यात आले. उद्यमबाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पी. जी. गंडव्वगोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी एकूण चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मटका चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. या यशस्वी कामगिरीबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांनी (डीसीपी) दोन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.





