बेळगाव लाईव्ह :
मराठी शाळांचे अस्तित्व आणि सीमाभागातील मराठी अस्मितेचा प्रश्न महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी चित्रपट माध्यमाचा प्रभावी वापर केला जाईल, अशी भूमिका प्रख्यात दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
रविवारी मराठा मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात ‘अस्तित्व मराठी शाळेचे, संवर्धन मराठी भाषेचे’ या विषयावर त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार मनोहर किनेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, मराठा मंदिरचे आप्पासाहेब गुरव, माझी महापौर रेणू किल्लेकर आणि खानापूर समितीचे देसाई होते.
मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उच्च पदे गाठली असून इंग्रजी भाषेवरही त्यांचे उत्तम प्रभुत्व आहे, असे नमूद करत त्यांनी मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
“भाषा हीच आपली आई आहे. आईला कोणी विसरत नाही. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यासच संस्कृतीची जोपासना होते,” असे ते म्हणाले. महाराष्ट्रात मराठी शाळांची घटती संख्या आणि पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. सीमाभागातही अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सीमालढा हा लोकशाही मार्गाने सर्वाधिक काळ चाललेला लढा असल्याचा उल्लेख करत, बेळगावचा प्रश्न आणि येथील बोलीभाषा यावर आधारित चित्रपट तयार करून तो महाराष्ट्रभर प्रदर्शित करण्याचा मानस त्यांनी जाहीर केला. सीमाभागातील जनतेसाठी ‘क्रांतिज्योती’ हा मराठी माध्यमावरील चित्रपट मोफत दाखवून त्यातून उभारलेला निधी सीमालढा आणि मराठी शाळांसाठी वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सामान्यज्ञान स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही शाळांना ‘आदर्श शाळा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.





