बेळगाव लाईव्ह :नागपूर येथे आयोजित ‘अॅडव्हांटेज विदर्भ -2026’ या आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेत ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे बेळगावच्या मे. श्री कामाक्षी सिल्वर या फर्मला “क्राऊन ऑफ एक्सलन्स – द सिल्वर लिगसी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा गौरवपूर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मे. श्री कामाक्षी सिल्वर या फर्मने चांदी उद्योगात मिळवलेले अतुलनीय यश आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे उत्कृष्ट कारागिरी, गुणवत्ता, प्रामाणिक व्यापार पद्धती आणि विश्वास, परंपरा व नेतृत्वाच्या मूलभूतांवर निर्माण केलेला वारसा जपणाऱ्या उद्योगांचा या माध्यमातून गौरव केला जातो.
बेळगावमध्ये किरण प्रकाश शिरोडकर आणि गणेश लक्ष्मण भातकांडे यांनी स्थापन केलेल्या ‘मे. श्री कामाक्षी सिल्वर’ने गेल्या अनेक दशकांपासून आपल्या सेवा, नाविन्यपूर्ण संकल्पना आणि उत्कृष्टतेच्या जोरावर चांदीच्या व्यापारात मानाचे स्थान मिळवले आहे. ‘अॅडव्हांटेज विदर्भ 2026’ या परिषदेत 22 देशांतील प्रतिनिधींसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजक, आणि गुंतवणूकदार सहभाग घेतला होता. या जागतिक मंचावर हा पुरस्कार मिळणे ही केवळ मे. श्री कामाक्षी सिल्वरसाठी नव्हे तर बेळगावसाठी अभिमानाची बाब आहे.

सदर यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना संस्थापक म्हणाले की, “माननीय केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते हा सन्मान मिळणे आमच्यासाठी मोठे प्रोत्साहन आहे. यामुळे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची आणि उद्योगाच्या वाढीत योगदान देण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली आहे.
” या पुरस्कारामुळे ‘मे. श्री कामाक्षी सिल्वर’ने आपल्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, चांदीच्या उद्योगातील एक विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित नाव म्हणून त्यांचे स्थान अधिक घट्ट झाले आहे.




