belgaum

राजहंसगड ते येळ्ळूर: मराठी सन्मान यात्रेचा पहिला टप्पा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: मराठी सन्मान यात्रेच्या पुढील नियोजनासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, सीमाभाग, यांची बैठक आज मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीचे अध्यक्ष शुभम शेळके होते.
बैठकीची सुरुवात कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक करून केली.

त्यांनी २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन २५० सीमावासीय कार्यकर्त्यांनी उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.


अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले की, येत्या शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी मराठी गौरव दिनाचे औचित्य साधून दुपारी ३.३० वाजता राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून मराठी सन्मान यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेतून बाईक रॅली सुळगा (ये.) व येळ्ळूर पर्यंत होईल. येळ्ळूरमध्ये बाईक रॅली नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा होईल. यात्रेचे पुढील टप्पे टप्प्याटप्प्याने पार पाडले जातील आणि माध्यमांद्वारे माहिती देण्यात येईल, असे ते म्हणाले.

 belgaum


सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी बैठकीतील ठराव वाचून सांगितले. त्यात पुढील मुद्दे होते:
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
किल्ले रायगड येथील सन्मान यात्रेचे दर्जेदार वृत्तांकन करणाऱ्या माणगाव (रायगड) येथील पत्रकार नरेश विठ्ठल पाटील आणि सीमाभागातील मराठी पत्रकारांचे अभिनंदन केले. सहभागी कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.


सर्वोच्च न्यायालयातील त्रीसदस्यीय खंडपीठ १६ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार असून, महाराष्ट्र सरकारकडे सीमाप्रश्नी न्यायालयीन कामकाजाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी प्रगतशील लेखक संघ साहित्य संमेलनात सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी सीमाभागात एक लाख सह्यांची मोहिम राबवावी असे आवाहन केले. बैठकीत याला पाठिंबा देऊन युवा समितीने सहभागाची तयारी दर्शवली.


बैठकीला शिवाजी हावळानाचे, अशोक घगवे, मोतेश बारदेशकर, इंद्रजीत धामणेकर, शशिकांत सडेकर, सुरज जाधव, श्रीकांत नांदुरकर, अभिषेक कारेकर, निलेश काकतकर, रोहित जाधव, ओमकार जाधव, साईराज कुगजी, सविता राऊत, अभिजीत मजुकर, प्रतीक गुरव, रणजित हवळाणे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.