belgaum

त्या..व्हिडिओतील प्राणी बिबट्या नव्हे, रानमांजर

0
900
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील क्लब रोड, कॅम्प परिसर तसेच गणेशपुर भागात बिबट्याच्या वावराच्या अफवांनंतर वन विभागाने तपास मोहीम तीव्र केली आहे. लिंगराज कॉलेजच्या मागील बाजूस आणि सीपीएड मैदान परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून या भागात ट्रॅप कॅमेरे आणि सापळे लावण्यात आले आहेत या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे कोणतेही निशाण आढळले नाहीत असा खुलासा वन खात्याने केला होता.


केवळ सीपीएड मैदान परिसरातच नव्हे, तर रेसकोर्स परिसर, गणेशपुर आणि कॅम्प भागात मोक्याच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवून तसेच ठिकठिकाणी पिंजरे ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आगामी काही दिवस ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.


दरम्यान, बुधवारी या परिसरात बिबट्या फिरत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र तो प्राणी बिबट्या नसून रानमांजर असल्याचा खुलासा वन विभागाने केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.


नागराज बाळेहोसूर (एसीएफ) यांनी सांगितले की, “व्हायरल व्हिडिओतील प्राणी हा बिबट्या नसून जंगली मांजर आहे. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये त्याचे स्पष्ट फोटो मिळाले आहेत.”


तसेच, आणखी दोन ते तीन दिवस सापळे तसेच ठेवण्यात येणार असून पुढील चार दिवस परिसरावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. इतर कोणत्याही वन्यप्राण्याचा वावर आढळतो का, याची खात्री करून त्यानंतर ट्रॅप कॅमेरे व सापळे हटवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


वन विभाग पूर्णपणे सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.