बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात विविध ठिकाणी घडलेल्या दुचाकी वाहनांच्या चोरी प्रकरणांचा छडा लावताना सीसीबी पोलिसांच्या विशेष पथकाने दोघा चोरट्यांना गजाआड केले असून त्यांच्या जवळील तीन मोटरसायकली व दोन स्कूटर अशी एकूण 1 लाख 20 हजार रुपये किमतीची 5 दुचाकी वाहने जप्त केली आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे रजत संजय शिवणगेकर (वय 29, रा. कंग्राळी खुर्द ता. जि. बेळगाव) आणि विठ्ठल सदेप्पा अरेर (वय 38, रा. शिगीहळ्ळी, ता. बैलहोंगल जि. बेळगाव) अशी आहेत. यापैकी आरोपी रजत याच्यावर एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केएलई हॉस्पिटल जवळ, तसेच विठ्ठल याच्यावर मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फोर्ट रस्त्यावर दुचाकी वाहने चोरल्याचा गुन्हा नोंद झाला होता. सदर दुचाकी चोरींचा तपास लावून चोरट्यांना अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सीसीबी पोलीस निरीक्षक नंदिश्वर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री यांच्या नेतृत्वाखाली सीसीबी पोलिसांचे एक विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने वेगाने तपास चक्रे फिरवून वरील दोन आरोपींना ताब्यात घेतले. तसेच पोलीस चौकशी आरोपींनी गुन्हा कबूल केल्यानंतर त्यांच्या जवळील दोन होंडा एक्टिवा, दोन स्प्लेंडर मोटरसायकली आणि एक बजाज प्लेटिना मोटरसायकल अशी एकूण 1,20,000 रुपये किमतीची चोरीला गेलेली 5 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. याप्रकरणी सीसीबी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
शहापूर पोलिसांकडून दोघा मटका बुकिंना अटक
बेळगाव शहरातील शहापूर आणि वडगाव येथे सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचे पैसे मटका जुगारावर लावणाऱ्या दोघा मटका बुकिंना शहापूर पोलिसांनी काल मंगळवारी अटक केली. तसेच दोघांजवळील जुगाराचे साहित्य व रोख 11,010 रुपये जप्त केले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे शंभू संतोष कणूकले (वय 31, रा. पहिला क्रॉस भारतनगर, बेळगाव) आणि मिलिंद अशोक सुतार (वय 43, रा. लक्ष्मी गल्ली, जुने बेळगाव) अशी आहेत. यापैकी शंभू हा शहापूर कोरे गल्लीच्या कोपऱ्यावर सार्वजनिक ठिकाणी लोकांचे पैसे मुंबई मटका जुगारावर लावत होता. त्यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून शंभूला रंगेहात पकडले आणि त्याच्याकडील मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या. पोलीस चौकशीत शंभू यांने आपण जुगाराचे पैसे अन्य एक आरोपी भारत राजू अम्मगोळ (वय 26 रा. कोरे गल्ली शहापूर) याच्या सांगण्यावरून गोळा करत होतो अशी माहिती दिली. त्यामुळे त्या दोघांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात मिलिंद हा बेळगाव शहरातील वडगाव येथील चावडी गल्ली क्रॉस जवळ लोकांचे पैसे मुंबई मटका या जुगारावर लावत होता. त्याला शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एस. एन. बसवा व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून पकडले. तसेच त्याच्या जवळील रोख 11,010 रुपये आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या. पोलीस चौकशीत शंभू यांने आपण जुगाराचे पैसे गोळा करून अन्य एक आरोपी अनिल चिन्नस्वामी रजपूत (रा. कपिलेश्वर कॉलनी बेळगाव) याला देत असतो, अशी माहिती दिली. त्यामुळे या दोघांविरुद्ध देखील शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.




