बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या क्लब रोड परिसरात वन्य प्राण्याने प्रवेश केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात असून काहींच्या मते तो बहुदा बिबट्याच असावा असा तर्क केला जात आहे. वन्य प्राण्याच्या प्रवेशाबाबत वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे. सध्या क्लब रोडसह रेस कोर्स परिसरात वनखात्याची गस्त सुरू झाली असून कथित वन्य प्राण्याला हेरण्यासाठी ड्रोनची देखील मदत घेतली जात आहे.
बेळगाव शहराच्या क्लब रोड परिसरात खरंच एखाद्या बिबट्याचा किंवा अन्य वन्य प्राण्याचा शिरकाव झाला आहे का? याची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीच क्लब रोड सीपीएड कॉलेज मैदान रस्त्यावर शनिवारी रात्रीपासून बेळगाव क्लब रोड भागामध्ये शनिवारी रात्री वन खात्याच्या वाहनांसह वनाधिकारी व कर्मचारी तळ ठोकून आहेत. लोकांमध्ये घबराट निर्माण होऊन शांतता भंग होऊ नये यासाठी वन्य प्राण्याला शोधण्याच्या मोहिमेबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आले होती. त्यासाठीच वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी साध्या वेशात क्लब रोड येथे दाखल झाले होते. तथापि त्यांची शोध मोहीम फार काळ गुप्त राहू शकली नाही. कारण संबंधित अधिकारी आणि कर्मचारी वन्य प्राण्याच्या शिरकावा बाबत चर्चा करत असताना त्यांच्या तोंडून ‘लेपर्ड’ या शब्दाचा उच्चार झाल्याचे एका जागरूक युवकाच्या कानावर आले. त्यावरून क्लब रोडसह रेस कोर्स परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचाच शिरकाव झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सध्या वनखाते आणि पोलीस खाते सतर्क झाले आहे.
दरम्यान, बेळगावचे डीसीएफ क्रांती यांनी देखील क्लब रोड परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वन्यप्राणी आढळून आल्याची माहिती मिळाल्याने आम्ही गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात 24 तास लक्ष ठेवून आहोत. तथापि वन्यप्राण्याच्या वावराबाबत अद्यापपर्यंततरी कोणत्याही हालचाली अथवा पुरावे हाती लागलेले नाहीत. वन्य प्राण्याला हेरण्यासाठी सकाळ संध्याकाळ ड्रॉच्या सहाय्याने बारकाईने पाहणी केली जात आहे, अशी माहिती डीसीएफ क्रांती यांनी दिली आहे. याखेरीज घटनास्थळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही व्यक्तींनी दावा केला आहे की त्यांना क्लब रोडवरील एका कॉलेज कॅम्पसमधील दाट झुडुपात बिबट्यासारखी हालचाल दिसली. या माहितीवरून तातडीने कारवाई करत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण केले. या निरीक्षणाअंती सध्या तरी, परिसरात बिबट्याच्या उपस्थितीचे कोणतेही अधिकृत पुरावे, पंजाचे ठसे किंवा सीसीटीव्ही फुटेज नाही. तथापि, खबरदारीचा उपाय म्हणून, विभाग स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने लक्ष ठेवून आहे. यापूर्वी 2021 मध्ये क्लब रोड जवळील पट्ट्यातील गोल्फ कोर्स भागात बिबट्या दिसल्याची नोंद झाली होती. त्यावेळी प्रशिक्षित कर्मचारी आणि उपकरणांच्या मदतीने व्यापक शोध मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी संबंधित भागात दहशत निर्माण होण्याबरोबरच बिबट्याला जेरबंद करण्याच्या प्रयत्नात वन आणि पोलीस खात्याची दमछाक झाली होती. या दोन्ही खात्यांची जवळपास महिनाभर दमछाक केल्यानंतर कोणालाही इजा न करता तो बिबट्या पुनश्च माघारी आपल्या नैसर्गिक अधिवासात गायब झाला होता.
उल्लेखनीय म्हणजे, २०२१ मध्ये याच परिसरातील गोल्फ कोर्सजवळ बिबट्या दिसला होता . त्या वेळी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि विशेष साधनसामग्री वापरून मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवण्यात आली होती.दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सोशल मीडियावर जुने व्हिडिओ, फोटो किंवा अप्रमाणित संदेश प्रसारित करू नयेत, असे आवाहन वन खात्याकडून करण्यात आले आहे. जुन्या किंवा चुकीच्या माहितीमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती आणि संभ्रम निर्माण होऊ शकतो.

तेंव्हा सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना घाबरू जाऊ नये. तसेच जुने व्हिडिओ, फोटो किंवा सोशल मीडियावर असत्यापित संदेश प्रसारित करणे टाळण्याचे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले आहे. कांही नागरिकांनी बेळगावच्या क्लब रोड परिसरात बिबट्या दिसल्याची तक्रार केल्यानंतर वन विभागाने त्याची पाहणी केली आहे. जुने दृश्य शेअर केल्याने अनावश्यक भीती आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो.
संबंधित भागातील रहिवाशांना विनंती आहे की त्यांनी सतर्क राहावे, विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी उशिरापर्यंत आणि जर त्यांना कोणत्याही संशयास्पद प्राण्याच्या हालचाली दिसल्या तर त्यांनी त्वरित वन विभाग किंवा स्थानिक पोलिसांना कळवावे. वेळेवर आणि अचूक माहिती मिळाल्यास अधिकाऱ्यांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यास मदत होईल, असेही आवाहन करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती निरीक्षणाखाली असली तरी सर्वसामान्यांमध्ये अनेक तर्कवितर्क केले जात आहेत.



